केंद्र सरकारने विविध वस्तूंवर जीएसटीच्या रुपाने भरमसाठ कर लागू केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांचेही कंबरडे मोडत आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. गूड आणि सिम्पल टॅक्स म्हणून जीएसटी लागू करण्यात आला. हा कर व्यापारी आणि वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन नियमांमुळे व्यापारी वर्गाला वेठीस धरले जात आहे. त्यांना निर्धारित वेळीच रिटर्न दाखल करावा लागतो. विशेष म्हणजे त्यात झालेली चूक सुधारता येत नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. साहित्य पुरवठादाराने जीएसटी नियमांची पूर्तता न केल्यास खरेदीदाराला त्याचा बोझा सहन करावा लागतो. कर प्रणालीत अनेक नियम जटील असल्याचा आरोप चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे केला जात आहे. या जटील नियमांच्याविरुद्ध शुक्रवारी दारव्हा, घाटंजी आणि आर्णीत बंदची हाक देण्यात आली होती.
आर्णी शहरात व्यापाऱ्यांनी सकाळपासून स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कांतीलाल कोठारी यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. घाटंजी येथेही बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. काही किरकोळ दुकाने सुरू होती. दारव्हातही संमिश्र प्रतिसाद मिळाला.