ग्राहक त्रस्त : शेतकरी वैतागले, ओलित करणे कठीण, कमी दाबाचा वीज पुरवठावणी : वणी व मारेगाव तालुक्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराने आता कळस गाठला. घरगुती वीज ग्राहकांना भरमसाठ देयक पाठवून, तर शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा करून महावितरणने सर्वच ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी ग्राहक आता प्रचंड संतप्त झाले आहेत.महावितरणतर्फे घरगुती ग्राहकांना १० ते २० हजार रूपयांचे अवाजवी देयक दिले जात आहे. ज्यांच्या वीज वापर अत्यंत कमी आहे, अशांना हजारोंची देयके पाठविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ज्यांना मासिक ४३० ते ५०० रूपयांचे देयक होत होते, त्यांना आता चक्क २० हजारांच्यावर देयक आले आहे. त्यामुळे घरगुती ग्राहक पुरते बेजार झाले आहेत. विद्युत देयकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेकदा त्यावर मीटरचा फोटो नसतो. याबाबत संबंधित देयक देणाऱ्यास विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नाही. शिवाय देयक उशिरा मिळत असल्यामुळे दर महिन्याला दंडाची रक्कमही ग्राहकांच्या मानगुटीवर बसत आहे. घरोघरी जाऊन रिडींग घेण्यास कोणताही कर्मचारी येत नसून रिडींगमध्ये अनेकदा मीटरचा फोटोसुद्धा घेतला जात नसल्याची ओरड ग्राहकांकडून सुरू आहे.वणी उपविभागात नवीन विद्युत मीटर लावण्यात आले आहे. तेव्हापासून देयकांचा घोळ सातत्याने सुरूच आहे. याकडे लक्ष देण्यास उपविभागातील महावितरणचे अधिकारी तयार नाहीत. देयकाबाबत तक्रार घेऊन गेल्यास ग्राहकांना प्रथम देयक भरा, त्यानंतर तक्रारीचा विचार होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला नाईलाजाने परतावे लागते. या सर्व बाबींची चौकशी करून सर्वसाधारण विद्युत ग्राहकांना येणाऱ्या वारेमाप देयकावर तोडगा काढावा, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
महावितरणचा भोंगळ कारभार
By admin | Published: October 16, 2015 2:16 AM