फीडर रखडले : अद्याप कामांना सुरूवातच नाही, ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोषवणी : महावितरणचा कारभार आता चांगलाच ढेपाळला असून विजेच्या समस्यांनी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. फिडरची कामे रखडल्याने कधीही वीज गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील महावितरणच्या ३७ पैकी तब्बल १६ फीडरचे काम अपूर्ण आहे. पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारीत हे तालुके येतात. या तीन तालुक्यात ३७ फीडर आहेत. मात्र त्यापैकी १६ फिडरची कामे अपूर्ण असल्याने विजेचा संपूर्ण भार २१ फिडरवर येत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी प्रयत्न केले. मात्र फिडरची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ओलित करणेही कठीण झाले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे पीक करपले. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच अचानक वीज गुल होण्याचे प्रमाण प्रचड वाढल्याने शेतकऱ्यांसह वीज ग्राहक प्रचंड संतापले आहेत. ग्राहकांच्या संतापाचा बांध कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासोबतच तीनही तालुक्यात योग्य दाबाचा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे घरातील वीज उपकरणे शोभेचे ठरत आहे. मोटारपंप सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. तरीही महावितरण प्रचंड सुस्त आहे. रखडलेल्या फिडरच्या कामांना वेग देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली जात नाही. रखडलेल्या १६ फिडरपैकी नऊ फिडरची कामे सुरू झाल्याचे आत्तापर्यंत सांगण्यात येत होते. उर्वरित सात फिडरची कामे बंदच होती. मात्र सुरू झालेली कामेही रेंगाळली आहेत. कंत्राटदारांनी कामाला सुरूवातच केली नाही. तरीही महावितरण त्यांना काम सुरू करण्याबाबत निर्देश देत नाहीत. या सर्व प्रकारामुळे तीनही तालुक्यात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. फिडरची कामे रेंगाळल्याने वीज ग्राहकांना नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
महावितरणचा भोंगळ कारभार
By admin | Published: August 09, 2014 11:58 PM