ऑनलाईन लोकमतवणी : येथील इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या सर्वसाधारण सभेत गुरूवारी चांगलाच राडा झाला. संबंधित कंत्राटदार सुतगिरणीतील विजेची कामे करीत नसल्याच्या मुद्यावरून सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे व संचालक असलेले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सभेत प्रचंड गोंधळ उडाला. शिव्यांची लाखोळी वाहत एकमेकावर खुर्च्या उचलण्यापर्यंत प्रकरण हातघाईवर आले. मात्र काहींनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला. त्यानंतर सभा सुरळीत पार पडली.गुरूवारी इंदिरा सहकारी सुतगिरणीची सर्वसाधारण सभा सुतगिरणीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत सात विविध विषयांवर चर्चा केली जाणार होती. या सभेला अध्यक्ष सुनिल कातकडे यांच्यासह १९ संचालक उपस्थित होते. सुतगिरणीचे संचालक असल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हेदेखील या सभेला उपस्थित होते. दुपारी १.१० मिनिटांनी या सभेला प्रारंभ झाला. सभेच्या सुरूवातीला मागील सभेचे ईतिवृत्त वाचण्यात आले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुतगिरणीतील विजेच्या कामाबद्दलचा मुद्दा सभेत उपस्थित केला. या कामाचे कंत्राट नांदेड येथील अनुज ईलेक्ट्रिकल या कंपनीला देण्यात आले आहे. या कंत्राटदार कंपनीला काही रक्कमही अदा करण्यात आली. मात्र या कंपनीने अद्यापही काम सुरू केले नाही. त्यामुळे या कंत्राटदार कंपनीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे मत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मांडले. मात्र सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे यांनी त्यावर आक्षेप घेतला. आकसापोटी कुणाही विरुद्ध तक्रार करणे योग्य नाही. आपण या कंपनीकडून काम करून घेऊ, अशी भूमिका कातकडेंनी मांडली. येथूनच वादाला तोंड फुटले. एकमेकांना शिविगाळ सुरू झाली. यामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. एकमेकांना पाहून घेण्याची भाषाही सभेत बोलल्या गेली. वाद वाढत जाऊन एकमेकांवर खुर्च्याही उगारण्यात आल्या. त्यामुळे तणावात भर पडली. दरम्यान, प्रकरण हातघाईवर येत असल्याचे पाहून काही संचालकांनी पुढाकार घेत दोघांनाही शांत केले. गुरूवारी दिवसभर वणी शहरात या वादाची चर्चा सुरू होती.सूत गिरणी अध्यक्षांची हुकूमशाही - बोदकुरवारसहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे हे हुकूमशहा बनले असून ते बहुमताचा आदर करीत नाहीत, असा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. दोन कोटी रुपयांचे सुतगिरणीचे विजेचे काम चार वर्षांपासून पेंडिंग आहे. संबंधित कंत्राटराला अग्रीम रक्कमदेखील देण्यात आली आहे. प्रोसिडिंगमध्ये त्याची नोंद घ्यावी, असे मी सुचविले. याच मुद्दयावरून सुनिल कातकडे व माझ्यात वाद झाला, असे आमदार बोदकुरवार म्हणाले.आमदारांकडून अश्लील भाषेत शिवीगाळ - कातकडेकोणत्याही मुद्दयावर मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार करा, असा आग्रह आमदार बोदकुरवार यांनी धरला. परंतु मला ते योग्य वाटले नाही. हेतुपुरस्सर तक्रार करण्यापेक्षा त्या कंत्राटदाराकडून काम करून घ्यावे, अशी भूमिका मी मांडली. त्यावर आमदारांनी महिला संचालकांसमोर मला अतिशय अश्लिल भाषेत शिविगाळ सुरू केली. यापूर्वीदेखील दोनवेळा त्यांनी सभेत मला शिविगाळ केली. पाहून घेण्याची धमकी दिली. ही कोणती सभ्यता आहे? असा सवाल इंदिरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
आमदार व गिरणी अध्यक्ष भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:01 PM
येथील इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या सर्वसाधारण सभेत गुरूवारी चांगलाच राडा झाला. संबंधित कंत्राटदार सुतगिरणीतील विजेची कामे करीत नसल्याच्या मुद्यावरून सुतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे व संचालक असलेले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत राडा : एकमेकांवर खुर्च्या उगारल्या, शिव्यांची लाखोळी