वणी (यवतमाळ) : येत्या ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मराठी मुलुखात अशा पद्धतीने मराठी साहित्यिकांचा अनादर झाल्यास साहित्य संमेलनच गनिमी काव्याने उधळून लावू, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक व लेखिका नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार आहे. आयोजकांच्या विचित्र धोरणाने हे संमेलन होण्याआधीच गाजत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात मराठी सारस्वतांचा मेळा भरेल, अशी अपेक्षा होती. परंतु या साहित्य संमेलनातील अमराठी साहित्यिकांची घुसखोरी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी साहित्यिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी लेखिकेच्या हाताने व्हावे, ही बाबच संताप आणणारी असल्याचे उंबरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. साहित्य हे कुठल्याही भाषेत असो, ते प्रबोधनकारीच असते, ही बाब आम्ही नाकारत नाही. परंतु यवतमाळात भरणारे साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांचे आहे. एकीकडे स्वत:ला मराठी भाषेचे रक्षणकर्ते म्हणायचे आणि दुसरीकडे मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवायचे, हा केवळ मराठी भाषिकांचाच नव्हे, तर मराठी सारस्वतांचादेखिल अपमान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बाब कदापीही खपवून घेणार नाही, असे उंबरकर म्हणाले.
यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असूनसुद्धा बहुतांश आदिवासी बांधव मराठीचा आदर करत मराठी भाषा बोलतात. अशा जिल्ह्यात पार पडणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजी साहित्यिकाला पाचारण करावे, याला आयोजकांची बौद्धीक दिवाळखोरी समजायची काय, असा सवालही उंबरकर यांनी उपस्थित केला. एकीकडे मराठी भाषेचा उदोउदो करायचा, तिच्या संगोपनासाठी आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे या भाषेच्या विकासासाठी आयुष्य वेचणाºया सच्चा मराठी साहित्यिकाला डावलून मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इंग्रजी साहित्यिकाला बसवावे, यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नाही, असेही उंबरकर म्हणाले. अशा पद्धतीने आयोजक मनमानी करत असतील, तर हे संमेलनच आम्ही उधळून टाकू, त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करू, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.