आठ टँँकर : पाण्यासाठी होणारी महिलांची पायपीट थांबली, मनसेचा स्तुत्य उपक्रमवणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी, मारेगाव, झरी शहरात मोफत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात रखरखत्या उन्हात मनसेचे कार्यकर्ते पाणी वाटपासाठी जिवाचे रान करीत आहे.गेल्या सहा वर्षांपूर्वी वणीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी मनसेने रात्रंदिवस मोफत पाणी पुरवठा केला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचून पाणी भरून दिले होते. तशीच काहीशी परिस्थिती यावर्षीही निर्माण झाली आहे. त्यामुळे अखेर पुन्हा मनसेच महिला, भगिनींच्या डोळ्यातील पाणी बघून पाणी वाटपासाठी पुढे सरसावली आहे. नगरपरिषदतर्फे दररोज पाणी पुरवठा होत नसल्याने काही परिसरातील महिला, पुरूष दररोज मनसेच्या टँकरची वाट बघत असल्याचे दृश्य शहरात दिसून येत आहे.वणी शहरातील विठ्ठलवाडी, प्रगतीनगर, जैन ले-आऊट, गुलमोहर पार्क, सर्वोदय चौक, रजानगर, विवेकानंद शाळेमागील परिसर, मोमीनपुरा, पटवारी कॉलनी आदी परिसरात मनसेचे कार्यकर्ते जनतेची तहान भागवीत आहे. वणी शहरात राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत थेरे, संतोष कोनप्रतीवार यांच्या मार्गदर्शनात दोन मोठे आणि तीन लहान, अशा पाच टँकरव्दारे दररोज रात्री उशीरापर्यंत पाणी पुरवठा सुरू आहे. दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. रखरखत्या उन्हातही मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पाणी वाटताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना गेल्या सहा वर्षांपूर्वीच्या पाणी टंचाईची आठवण होऊ लागली आहे. वणीप्रमाणेच मारेगाव शहरात दोन, तर झरी येथे एका टँकरव्दारे मनसेने पाणी पुरवठा सुरू केला आहे. मारेगाव आणि झरी नगरपंचायत पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने शेवटी महिलांना मनसेच्या टँकरने आधार दिला आहे. मोफत पाणी वाटपासाठी महिला, भगिनी मनसेला धन्यवाद देत आहे. रोशन शिंदे, राहुल कुचनकार, मयूर गेडाम, लकी सोमकुवर, नगरसेवक धनंजय त्रिंबके, इरशाद खान, इरफान सिद्दीकी, अजू शेख, प्रशांत गाऊत्रे, शंकर पिंपळकर आदी कार्यकर्ते तहान, भूक विसरून पाण्याचा पुरवठा करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मनसेतर्फे वणी, मारेगाव, झरीत पाणी पुरवठा
By admin | Published: May 19, 2016 2:10 AM