यवतमाळ : ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हा प्रकार सध्या मोबाईल फोनमुळे अतिवाढला आहे. आयडिया, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएलसारख्या कंपन्यांच्या नेटवर्क समस्येमुळे चक्क घरोघरी भांडणे वाढत आहेत; तर विविध कार्यालयांतील दैनंदिन कामावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र कंपन्यांची स्थानिक यंत्रणा या समस्येकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.
गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, आवाज आला तरी तुटक-तुटक ऐकायला येणे यातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेकांची चिडचिड होत आहे. विशेषत: दिवसभर घराबाहेर राहणारे नवरा-बायको या समस्येचे बळी ठरत आहेत.
एकमेकांना फोन केल्यावर मध्येच फोन कट झाल्यास गैरसमजातून पत्नी-पत्नीची भांडणे वाढली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांना फोन केल्यास संपर्कच होत नाही. यातून शासकीय व खासगी कार्यालयांची कामे प्रभावित झाली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवत असूनही मोबाईल व सिम कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यवतमाळात असलेल्या या कंपन्यांची सेंटर्स केवळ नाममात्र उरली आहेत. तेथे ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी धाव घेतल्यास ‘आमच्या हाती काहीच नाही, वरूनच प्राॅब्लेम आहे’ असे सांगून कर्मचारी जबाबदारी झटकतात.
जिल्ह्याचे शहर, पण परिस्थिती खेड्यासारखी
यवतमाळ हे जिल्हा मुख्यालयाचे शहर आहे. तरीही येथे फोनवरून होणाऱ्या संपर्काची परिस्थिती खेड्यापेक्षाही बिकट झाली आहे. एखाद्या खेड्यात मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी जसे घराच्या छतावर चढणे, झाडावर चढण्याचे प्रकार घडतात, तशी अवस्था यवतमाळ शहरातील मोबाईलधारकांची झाली आहे.
प्रतिष्ठित कंपन्यांकडून डोळेझाक
बीएसएनएल, आयडिया, व्होडाफाेन, एअरटेलसारख्या प्रतिष्ठित मोबाईल कंपन्यांचे ग्राहक ‘काॅल ड्राॅप’च्या समस्येने आठ दिवसांपासून हैराण असताना या कंपन्यांकडून सेवेत सुधारणा झालेली नाही. ग्राहक स्थानिक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. त्यामुळे संपर्काच्या सोयीसाठी घेतलेला मोबाईल फोन अनेकांसाठी भांडणाचे मूळ ठरत आहे.