वणी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे टॉवर्स आहेत. या टॉवर्समुळे नागरिकांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे.आधुनिक युगात भ्रमणध्वनीला फार महत्व आले आहे. खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहे. अगदी गुराख्याच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येत आहे. एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी आहेत. अनेकांकडे तर दोन-दोन भ्रमणध्वनी आहेत. या भ्रमणध्वनीच्या कव्हरेजसाठी आता गावांमध्ये टॉवर्स उभारण्यात आले. आता हेच टॉवर्स नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.केंद्र शासनाने सन १९९६ मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा तयार केला. मात्र या कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. या कायद्याने टॉवर्स उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घातले आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या मतानुसार टॉवर्स व ब्रॉडबँड मशिनरीमधून निघणाऱ्या लहरींमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि सूक्ष्मजीवांवर पेशीय, उपपेशीय, रेणूविय, उपरेणूविय जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिणामामुळे मानवाला कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. टॉवर्समधील किरणोत्साराच्या लहरींमुळे बाळांना व्यंगत्व,आंधळेपणा येण्याची शक्यताही असते. टॉवर किमान २०० फूट उंचावर असले, तरी त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सार लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रीटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मोबाईल टॉवर्समुळे नागरी आरोग्याला धोका
By admin | Published: July 08, 2014 11:42 PM