यवतमाळ : कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना मोकळ्या वातावरणात खेळायला मिळत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे. याला डॉक्टरांनीसुद्धा दुजोरा दिला आहे.
मार्च २०२०पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. काेराेना संक्रमण कमी न झाल्याने शासनाच्या आदेशान्वये वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आला. मुलांनी घरात बसून मोबाईलवर शिक्षण घेतले व परीक्षाही दिली. या काळात काेराेना संक्रमण कमी-अधिक होत राहिल्याने शालेय मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणेही दुरापास्त झाले. मैदानावर मोकळ्या वातावरणात मुक्तपणे खेळणे शक्य नसल्याने तसेच घरी कोणी समवयस्क खेळायला येत नसल्याने मुले वेळ घालवण्यासाठी बराच काळ टीव्ही बघणे, मोबाईलवर गेम खेळणे, याच बाबी करायला लागले. पालकांसमोर दुसरा पर्याय उरला नाही. या प्रकारामुळे बालमनावरील तणाव अप्रत्यक्षरित्या वाढत गेल्याने चिडचिड, भांडण वाढले आहे. या बाबीला डॉक्टरांनीसुद्धा दुजोरा दिला आहे.
बाल मनावर दीर्घकाळ असलेल्या तणावामुळे आरोग्यावर याचा विपरित होण्याची शक्यता आहे. मुलांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी पालकांनी तसेच घरातील मंडळींनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्यांच्याकडे मोबाईल देऊन दुर्लक्ष करू नये, त्यांच्याशी सतत गप्पा-गोष्टी कराव्या, त्यांच्यासोबत लहान-मोठे खेळ, खेळाविषयी त्यांचा उत्साह कायम टिकून राहील. तसेच त्यांना कंटाळवाणे वाटणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.