लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेतीमाफिया व क्रियाशील गुंडांनी धुडगूस घातला असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का, एमपीडीए लावा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील गुन्हेविषयक आढावा बैठक शुक्रवारी येथे पार पडली. विविध विषयांवर आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. रेती तस्करी हा जिल्ह्यातील महसूलपाठोपाठ पोलीस यंत्रणेसाठीही आव्हानाचा विषय ठरला आहे. थेट नायब तहसीलदारांना चाकू मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत रेतीमाफियांची मजल गेली आहे. या रेतीमाफियांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय अभय असल्याचे बोलले जाते. चाकूहल्ला करून कर्नाटकात आश्रय घेतलेल्या रेतीमाफिया तथा अट्टल गुंड अविनाश चव्हाण याला उमरखेड पोलिसांनी घटनेच्या १६ दिवसांनंतर बेळगावातून अटक केली. यावरून रेती तस्करीत नेमके कोण सक्रिय आहे हे स्पष्ट होते. पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात चालणारी रेतीची वाहने पकडून कारवाई करावी, वारंवार कारवाई करूनही न जुमानणाऱ्या माफिया-तस्करांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झाेपडपट्टी दादा कायदा) लावण्याचे आदेश देण्यात आले. ठाणेदारांनी आपल्या हद्दीतील माफिया, सक्रिय गुंड यांची यादी तयार करावी, त्यांच्या टोळीवरील रेकॉर्ड तपासून माेक्का, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून सादर करावेत, असे आदेश पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी दिले आहेत. उमरखेड येथील तहसीलदारांवर हल्ला करणारे माफिया अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदारांवर मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर चिंता, डिटेक्शनचे आव्हान शुक्रवारच्या क्राईम मीटिंगमध्ये वाढती गुन्हेगारी, गुन्हा घडण्यापूर्वीच प्रतिबंध करणे, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविणे, घडलेला गुन्हा उघडकीस आणणे, न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण वाढविणे, प्रलंबित मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सामाजिक शांततेला धोकादायक ठरू पाहणाऱ्या घटकांवर गोपनीय पद्धतीने वॉच ठेवणे, वाहतूक नियंत्रण, दारू, मटका, जुगार, गुटखा, अमली पदार्थ व इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणे यासंबंधीही पोलीस अधीक्षकांनी आदेश देऊन मार्गदर्शन केले.
‘एसडीएम’कडे तडीपारीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्तरावर तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तेथे संबंधित गुंड गावात राहणे कसे धोकादायक आहे, हे सांगून त्याला तडीपार करण्याबाबत युक्तिवाद करावा, मुद्दे मांडावे, असे निर्देश देण्यात आले आहे. या बैठकीत इतरही मुद्द्यांवर सविस्तर आढावा घेतला गेला.