यवतमाळ: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेतून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी प्रसंगी कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात काढलेला शासन निर्णय बघितल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. योजनेतील काही निकष शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे हि बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली .
नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशा सूचना दिल्या.ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे राज्य शासनाने दुष्काळी स्थितीमुळे पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित केले आहे अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, ज्या शेतकऱ्यांचे नाव या पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपलोड झाले आहे मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचा या योजनेत समावेश झाला पाहिजे त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली.
तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या सूत्रानुसार आर्थिक अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. उलट तत्कालीन भाजप सरकारने उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपस्थित केली. यानुसार त्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त मदत देण्याबाबत लगेच पावले उचलण्याच्या सूचना नानाभाऊ पटोले यांनी दिल्या. राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेतून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी यावेळी केले.