लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : बचत गटाच्या महिलांनी मोदी यांच्या कार्यक्रमात आपापल्या बँकेचे पासबूक घेऊन यावे व मोदींना आमच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याचा आग्रह करावा, असे आवाहन माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.पंतप्रधानासारख्या पदावर असणाऱ्या नरेंद्र मोदींनी जनतेला सतत खोटी आश्वासने देऊन त्यांच्या भावनेशी खेळ केला. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होईल, असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात एक छदाम्ही जमा झाला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी याच विधानसभा मतदार संघातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेऊन संपूर्ण देशातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु सत्तेवर येताच त्यांनी एकही आश्वासन पाळले नाही. देशाचे पंतप्रधान असलेले मोदी हे लोकशाही मानत नसून ते हुकूमशाहीने राज्य करीत असलेले सर्वात खोटारडे पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पांढरकवडा येथे बचत गटाच्या महिलांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. महिलांनी आता त्यांना १५ लाखाचा जाब विचारावा व सभास्थळी त्यांना भाषण करू देऊ नये, असे आवाहनही मोघे यांनी केले आहे.
मोदींच्या सभेत महिलांनी १५ लाखासाठी पासबूक आणावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:05 AM