राजकीय झडत्या : यवतमाळात पोळा उत्साहात, झडत्यांमधून सरकारवर टीकास्त्रयवतमाळ : ‘नरेंद्र मोदींचं विमान आकाशी उडालं, अन् शेतकरी बुडालं, मोदीच सरकार आलं, पैसे पोत्यात भरलं अन् शेतकरी बुडालं, भाऊ, दादा देशाचे नेते, पैशाने भरले पोते, घरात पोटभर खाते, नथ्थू शाहीर म्हणे, देशाचे नेते आकाशी उडते, एक नमन गौरा पार्वती, हर बोेला हरहर महादेव’. यासारख्या अनेक राजकीय झडत्यांनी गुरूवारी शहरात भरलेल्या पोळ्यात रंगत आणली. येथील आझाद मैदानात गुरूवारी दुपारी पोळा भरविण्यात आला. यावेळी नथ्थू शाहीर यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावरील वास्तववादी ‘झडत्या‘ सादर केल्या. त्यांच्या झडत्यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना जोरदार झटका बसला. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर चांगलीच गोची झाली. क्षणात त्यांचे चेहरेच कोमेजून गेले होते. यामुळे पोळ्यात चांगलीच राजकीय खसखस पिकली. शाहिरांच्या वास्तवावादी झडत्या मंचावरील नेत्यांना झोंबू लागल्याने अखेर संचलनकर्त्याने शाहीराला बाजूला सारले. केंद्र आणि राज्यात भाजपाप्रणीत सरकार येण्यापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते झडत्यांच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या धोरणावर टिका करीत होते. आता दोन्ही ठिकाणी त्यांचेच सरकार असल्यामुळे यावर्षी त्यांनी चक्क पोळ्यातून काढता पाय घेतला. त्यांची जागा या नथ्थू शाहीराने घेतली. यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी मात्र शाहीराच्या झडत्यांना जोरदार दाद दिली. त्यांनी वास्तव मांडल्यामुळे शेतकऱ्यांना क्षणभर का होईना दिलासा मिळाला.बाहेरच्या जोड्या यवतमाळातयेथील नगरपरिषदेने पोळयाची परंपरा यंदाही जपली. आझाद मैदानातील पोळयाची दिवसेंदिवस क्रेझ वाढतच आहे. यंदा बक्षीसाच्या वाढीव रकमेने तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांनीही आपली जोडी यवतमाळात आणली. यावर्षी ४१ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते. गेल्यावर्षी ८२ जोड्या होत्या. यात यंदा वाढ होऊन ९५ जोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या.अशोक भुतडा, रंजित वनकर, आणि डॉ.हटकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. बक्षीस वितरणाला नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरासमोर गुरुवारी मोठी यात्रा भरली होती. विविध दुकाने या ठिकाणी लागली होती. उशिरापर्यंत यवतमाळकरांनी या यात्रेचा आनंद लुटला. (शहर वार्ताहर) कापरा येथील गायकींची जोडी अव्वलपहिल्या क्रमांकाचे ४१ हजारांचे बक्षीस कापरा येथील गजेंद्र एकनाथ गायकी यांच्या जोडीने पटकाविले. बेलोना येथील नामदेव अवथरे यांच्या जोडीला दुसऱ्या क्रमांकाचे २१ हजारांचे, मोहा येथील दीपक सुलभेवार यांच्या जोडीला ११ हजार रूपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे, तर राळेगाव येथील नंदेश मशरू यांच्या जोडीला पाच हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
मोदींचे विमान उडाले, शेतकरी बुडाले
By admin | Published: September 02, 2016 2:20 AM