यवतमाळ: नाल्याशेजारी आलेल्या वानरांच्या कळपाने एकच आरडाओरड सुरू केली. लगतच्या शेतकऱ्याने तेथे जावून बघितले असता भयावह चित्र दिसले. चक्क अजगराच्या जबड्यात एक वानर अडकून असल्याचे आढळले. त्या शेतकऱ्याने लगेच सर्पमित्रांना पाचारण करून अजगराला अलगद पकडले.
तालुक्यातील कोळी (बुं) येथे सोमवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कोळी येथील हनुमान आत्राम आपल्या शेतात बैल चारत होते. त्यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेताच्या नाल्याजवळ वानरांचा कळप जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. आत्राम यांनी तेथे जाऊन पाहिले असता भला मोठा अजगर एका वानराला तोंडात धरून भक्ष्य बनविताना दिसला. लगेच हनुमान आत्राम यांनी सर्पमित्रांना फोन केला.
सर्पमित्र जुबेर पठाण, अल्ताफ सैय्यद, राहुल करलुके, शुभम साहारे, यश बन्सोड त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अजगराला अलगद पकडले. त्याच्या तोंडातून वानराला सुखरूप बाहेर काढले. मात्र, अजगराच्या पकडीत वानर मृत पावले होते. सर्पमित्रांनी अजगराला पकडून गावात आणले. तो अजगर तब्बल नऊ फूट लांबीचा होता. अजगर पाहून सर्वच अचंबित झाले. सर्पमित्रांनी एका प्लास्टिकच्या पोत्यात बंद करून त्याला सुरक्षित स्थळी साेडून दिले.