परिश्रमाचा सुगंध : महेंद्र घागरे करतोय चंदन लागवडीचा प्रसार काशीनाथ लाहोरे यवतमाळ शिक्षणाचा संबंध नोकरी आणि संपत्ती कमावण्यासाठी जोडला जातो. मात्र भरपूर संपत्ती कमावण्यासाठी शिक्षण आवश्यकच असते, ही संकल्पना मोडीत काढणारी ही एक सत्यकथा. इयत्ता चौथी उत्तीर्ण माणूस किती पैसा कमावू शकतो याचा अंदाजही कोलमडून टाकणारा एकेकाळचा उपेक्षित परंतु आजचा यशस्वी उद्योजक म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड येथील महेंद्र घागरे होय. चंदनरोप विक्रीच्या व्यवसायातून महेंद्र १०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक झाला. यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात चंदन लागवडीवर आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्र घागरे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली यशोगाथा सांगितली. शिक्षण नाही, कोणतेही कौशल्य नाही, जवळ पैसाही नाही, नोकरी, कामधंदा तर दूरच परिणामी नातेवाईकांच्या दृष्टीकोनातून अत्यंत बेकार माणूस. एके दिवशी एसटी बसमधून प्रवास करताना सागाची मुळे (स्टम्प) विकणारा शेतकरी भेटला. त्याच्याकडून माहिती घेतली. १९८५ पासून एका स्टम्पमागे ३० पैसे नफा घेऊन महेंद्रने व्यवसाय सुरू केला. त्यानंतर चार लाख रोपांची नर्सरी तयार केली. परंतु गिऱ्हाईक फिरके ना. ‘या वर्षी शेवटी यावर्षी रोपे न्या, पुढच्या वर्षी पैसे द्या’ अशी जाहिरात दिल्यावर रोपे विकल्या गेली. जशी अडचण येईल तशी उधारी वसूल केली. व्यवसाय वाढला, एक लाख रुपये महिना मिळू लागला. सागाबरोबर पुढे बंगलोर येथील चंदन संशोधन संस्थे जाऊन त्याची शास्त्रोक्त माहिती घेतली आणि चंदनाबाबतचे सगळे गैरसमज स्वप्रयत्नाने दूर करून चंदनाची रोपे विकायला प्रारंभ केला. आज घडीला महेंद्रची संपत्ती १०० कोटींची आहे. ज्या समाजाने, राष्ट्राने, पर्यावरणाने, वृक्षाने ही संपत्ती दिली, ते पाहून सर्वच आश्चर्यचकीत होतात. स्वत: त्यांचाही यावर कधीकधी विश्वास बसत नाही. पैशाची हाव अनेकांना मरेपर्यंत सुटत नाही. मात्र चौथा वर्ग शिकलेल्या या माणसाने पैशाचा मोह टाळत आता पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून कोल्हापूर विद्यापीठाने त्यांना सिनेट सदस्यत्व बहाल केले. अशा या आगळ्या वेगळ्या पर्यावरण प्रेमीने यवतमाळात येऊन येथील शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी प्रवृत्त केले.
चंदनाची किमया, १०० कोटींची माया
By admin | Published: July 03, 2015 12:17 AM