लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने वाढीव टँकर द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात खडका येथील नागरिकांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी महिलांनी घागरी फोडून निषेध केला.आर्णी तालुक्यातील खडका हे एक हजार लोकसंख्येचे गाव. गत महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. प्रशासनाने दोन टँकरने पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. मात्र केवळ एकाच टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खडका येथील शेकडो नागरिक डोक्यावर घागरी घेऊन आर्णी तहसीलवर धडकल्या. त्या ठिकाणी घागरी फोडून निषेध केला. या मोर्चात आर्णी पंचायत समितीचे सभापती सुरेश जयस्वाल यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.