सुश्री अलकाश्रीजी : यवतमाळात सप्त गौमाता परिक्रमालयाचे थाटात लोकार्पण यवतमाळ : इथे जमलेले सर्व लोक खूप भाग्यवान आहेत. जेथे काही वार्षांपूर्वी रामकथा झाली, त्याच ठिकाणी आता हे सुंदर असे सप्त गौमाता परिक्रमालय मंदिर निर्माण झाले आहे. तुम्ही गाईला जेवढे द्याल, त्यापेक्षा कितीतरी अधिक गाय तुम्हाला देईल, असे आशीर्वचन संत सुश्री अलकाश्रीजी देवी यांनी दिले. येथील अटल परिवार आणि गोरक्षण संस्थानच्या संयुक्त विद्यमाने सप्त गौमाता परिक्रमालय मंदिराचे लोकार्पण बुधवारी संत सुश्री अलकाश्रीजी देवी यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी उपस्थित सश्रद्ध नागरिकांच्या मंदियाळीला त्यांनी मार्गदर्शन केले. अलकाश्रीजींनी सर्वप्रथम सप्त गोमातांची परिक्रमा केली. व्यासपीठावर संत अलकाश्रीजी, रामलखनदास महाराज, गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष नंदलाल बागडी, प्रतिभादेवी अटल आदी मान्यवर विराजमान होते. सुश्री अलकाश्रीजी म्हणाल्या, जो गाईची नित्य सेवा करतो, त्याने आपली मनोकामना गाईच्या कानात सांगावी. ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते, असे संत सांगतात. तुमच्या घरी लग्नकार्य असो, वाढदिवस असो अशा कुठल्याही शुभप्रसंगी गोरक्षण संस्थानमध्ये येऊन जरूर गाईची सेवा करा. गोमातेच्या सेवेतून भवसागर तरूण जाणे शक्य आहे, असे संत सुश्री अलकाश्रीजींनी सांगितले. या ठिकाणी पुन्हा एकदा रामथा व्हावी, अशी इच्छाही त्यांनी शेवटी बोलून दाखविली. अलकाश्रीजींनी ‘श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी.. हे नाथ नारायण वासूदेव’ अशा ओळींनी आपल्या आशीर्वनाला प्रारंभ केला, तेव्हा उपस्थित सर्व तल्लीन झाले होते. रामलखनदास महाराज म्हणाले, या ठिकाणी अलकाश्रीजींच्या रामकथेने चेतना निर्माण झाली आहे. सप्त गौमाता परिक्रमालय साकारणाऱ्या अटल परिवाराचे आभार मानणे गरजेचे आहे. स्व. सुरजमलजी अटल हे जसे त्यांच्या परिवारात आदरणीय आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण गावाचेच मन जिंकले होते. मी नुकताच दक्षीण भारतातील तीन-चार मंदिरांचे दर्शन घ्यायला निघालो होतो. मात्र या कार्यक्रमाविषयी कळले आणि परत आलो. त्या मंदिरांच्या दर्शनापेक्षा आपल्या गावातील सप्त गौमातांची परिक्रमा महत्त्वाची आहे. यावेळी अटल परिवारातील अॅड. रतनलाल अटल, उज्ज्वला अटल यांनीही मनोगत व्यक्त केले. स्व. सुरजमलजी अटल यांच्या सामाजिक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कर्षा अटल हिने गणेशवंदना सादर केली. प्रास्ताविक गोरक्षण संस्थानचे सचिव किसन सिंघानिया यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री आणि रोशनी अटल यांनी केले. तर आभार डॉ. राजेश अटल यांनी मानले. शेवटी संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
तुम्ही जेवढे गाईला द्याल, त्यापेक्षा अधिक गाय तुम्हाला देईल
By admin | Published: February 02, 2017 12:20 AM