यवतमाळ : अनेकांना नानाविध उपाय, उपचार करूनही अपत्य प्राप्ती होत नाही. पण ज्यांना देव भरभरून देतो, त्यांना त्याची फिकीरच नसते. गुरुवारी तर एका जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बाळाला विकण्याचा डाव रचला. विशेष म्हणजे हे बाळ खरेदी करण्यासाठी यवतमाळातील काही प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीही सहकुटुंब पोहोचले होते. हा सर्व गंभीर प्रकार चक्क देवळात सुरू होता. आणि शेवटी देवच प्रशासनाच्या रूपाने धावून आला. डाव उधळला अन् बाळ शिशूगृहात सहीसलामत पोहोचले.
ही गोष्ट यवतमाळ तालुक्यातील एका खेड्यातून सुरू झाली. अर्चना (बदललेले नाव) या २५ वर्षीय युवतीचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला. परंतु काही दिवसातच ती पतीपासून विभक्त राहू लागली. अशातच तिचे तिसऱ्याशीच सूत जुळले. या प्रेमसंबंधातून ती गर्भवती राहिली. परंतु पोटी आलेले हे बाळ जगाला कसे दाखवावे हा प्रश्न या निष्ठुर मातेला पडला. अशातच तिला प्रसूतीसाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीसाठी येण्यापूर्वीच तिने हे बाळ एखादा गरजू व्यक्ती शोधून त्याला विकून टाकण्याचा मनोदय पक्का केला होता. याची वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेला किंचितही खबर नव्हती.
बुधवारी अर्चना प्रसूती होऊन तिने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु अर्चना हे बाळ दत्तक देण्याच्या नावाखाली कुणाला तरी विकणार असल्याची कुणकुण बाल विकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे यांना लागली. त्यांनी ही माहिती तातडीने महिला बाल कल्याण विभागाला आणि बालसंरक्षण कक्षाला कळविली.
तेव्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, अविनाश पिसुरडे, सुनील बोक्से, कोमल नंदपटेल या कर्मचाऱ्यांचे पथक वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. परंतु प्रसूतीनंतर या महिलेला सुटी देण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ती वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडल्याचे समजले. पथकाने तिच्या गावातही फोन करून विचारपूस केली असता ती गावात आलेलीच नाही असे कळले. त्यावेळी परिसरातील ऑटोरिक्षा चालकांना विचारपूस केली असता ती माता एका ऑटोरिक्षामध्ये दत्त चौक परिसरात गेल्याचे समजले. तेव्हा बालसंरक्षण कक्षाचे पथक तातडीने दत्त चौकात पोहोचले. त्यावेळी तेथील दत्त मंदिरात ही माता आपल्या बाळासह आढळून आली. विशेष म्हणजे हे बाळ मिळविण्यासाठी काही प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीही तेथे आढळल्या. मात्र बाळाचा सौदा होण्यापूर्वीच प्रशासनाने हा डाव उधळून लावला.
मंदिराचा आडोसा घेऊन बाळ विक्रीचा प्रकार घडण्यापूर्वीच बाल संरक्षण कक्षाचे पथक पोहोचले. तेव्हा कुणालाही अशा प्रकारे परस्पर मूल दत्तक घेता येत नाही, तो गुन्हा ठरतो. बाळ दत्तक घ्यायचे असल्यास त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, याबाबत संबंधित मातेला व तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना माहिती देण्यात आली. पथकाला पाहून बाळ दत्तक घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी लगेच काढता पाय घेतला. या मातेला बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण-२०१५) नुसार बाळ समर्पित करण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यानंतर नवजात बाळ व महिलेला बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार गुरुवारीच सायंकाळी वर्धा येथील शिशूगृहात हे बाळ सुपूर्द करण्यात आले.
अनेक लोक बाळ परस्पर दत्तक देण्याच्या नावाखाली गैरप्रकार करतात. परंतु तो गुन्हा आहे. एखाद्या पालकाला आपल्या बाळाचे पालन पोषण शक्य नसल्यास त्यांच्यासाठी अधिनियमात बाळ समर्पित करण्याची तरतूद आहे. त्यासाठी प्रशासनाला माहिती द्यावी.
- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी