लोकमत न्यूज नेटवर्कभवानी/ढाणकी : उमरखेड तालुक्यातील सोईट-घडोळी येथील पैनगंगा नदीच्या पात्रात माय-लेकीचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या दोघींनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज दराटी पोलिसांनी वर्तविला.नंदाबाई किशोर वानखेडे (४०) आणि साक्षी किशोर वानखेडे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहे. गुरुवारी सायंकाळी नंदाबाई यांचा पतीसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादातूनच नंदाबाई यांनी मुलगी साक्षी हिला सोबत घेऊन रात्री घर सोडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सोईट-घडोळी येथील पैनगंगा नदीत त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. शुक्रवारी सकाळी सोईट येथील काही नागरिक जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी पोलीस पाटील परमेश्वर बुरकुले यांना माहिती दिली. बुरकुले यांनी दराटीचे ठाणेदार भरत चपाईतकर यांना माहिती दिली. दराटी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. नंदा व त्यांची मुलगी साक्षीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तूर्तास दराटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. मृत नंदा वानखेडे यांना मृत साक्षी यांच्याशिवाय आणखी दोन मुले आहेत. त्यांचे मातृछत्र हरविले आहे.दरम्यान, मायलेकीच्या या मृत्यूमुळे भवानी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोघींचा मृतदेह पैनगंगा नदीत आढळल्याचे समजल्यानंतर भवानीचे पोलीस पाटील सुदर्शन कवाने, सरपंच चंद्रकला सुदाम पवार यांच्यासह भवानी, सोईट, वालतूर, घडोळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दराटी पोलीस व गावकऱ्यांनी दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. क्षुल्लक वादातून दोन जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मृतदेहांवर माहेरी वडगाव येथे होणार अंत्यसंस्कार- मृत नंदा किशोर वानखेडे यांचे माहेर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथील आहे. गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास नंदा व त्यांची मुलगी साक्षी घरातून निघून गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी वानखेडे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळल्या नाही. अखेरीस पैनगंगा नदीपात्रात त्यांचे मृतदेहच तरंगताना आढळले. दराटी पोलिसांनी पंचनाम्यानंतर दोघींचेही मृतदेह उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नंदा यांच्या भावांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्यावर वडगाव येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या दोन्ही भावांनी दिली.