लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : हुंड्यासाठी अंगावर रॉकेल टाकून सुनेला पेटवून देण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. १० जुलै २०१६ रोजी चाणी (ता. दारव्हा) येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सासू व दिराला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. राहुल गणेश रावेकर, बेबी गणेश रावेकर, अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
लग्नात कमी हुंडा दिला या कारणावरून अंजली दिनेश रावेकर हिला पती घरी नसताना आरोपी सासू व दीर मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तिला एक लाख रुपयांची मागणी केली जात होती. घटनेच्या दिवशी याच कारणावरून अंजलीला अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तिला यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना तहसीलदार यवतमाळ यांनी मृत्युपूर्व जबाब घेतला. त्यावरून लाडखेड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.
तपासादरम्यान अंजलीचा मृत्यू झाल्याने दाखल गुन्ह्यात भादंविचे कलम ३०२ समाविष्ट करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रवी वाहुळे यांनी तपास केला. सासू, दीर व नणंदेला आरोपी करण्यात आले. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष व पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपी बेबीबाई गणेश रावेकर आणि राहुल गणेश रावेकर यांना आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी माला मधुकर सदाफळे (५०, रा. वाटखेड खुर्द, ता. बाभूळगाव) यांना पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. अमोलकुमार राठोड यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल प्रेम राठोड यांनी सहकार्य केले.