लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : येथून पाच किलोमीटर अंतरावरील चुरमुरा गावाजवळील दगडथर रस्त्यावरील जंगलातील दरीत सुमित सोळंके (२३) या तरुणाचा मृतदेह १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या खून प्रकरणात अवघ्या १२ तासातच मारेकरी आरोपी आईच्या मामेभावाला अटक करण्यात आली होती. मात्र सुमितच्या खुनाचा कट रचण्यात आई मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अरुणा प्रभाकर सोळंके (४५), असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव आहे. सुमित प्रभाकर सोळंके याचा मृतदेह दगडथर रस्त्यावरील एका दरीत आढळून आला होता. सुमितच्या आईचा मामेभाऊ संदीप अवधूत जगताप (४१) याला पोलिसांनी अवघ्या १२ तासातच अटक केली होती.
या खूनप्रकरणी त्याला ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सुमित हा त्याची आई अरुणा सोळंके हिला सतत पैशाची मागणी करीत होता. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या सततच्या पैशाच्या मागणीला आई कंटाळली होती. आरोपीकडील पैशासाठीही तगादा लावत असल्याने सुमितच्या खुनाचा कट रचल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे सुमितच्या आईच्या दिशेने वळविली होती. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरुणा सोळंके हिला अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सरदार, गजानन गिते आदींनी केली.
१२ वेळा कॉल केल्याचे तपासात झाले उघड
- पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे महिलेच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले. अरुणा सोळंके हिच्या मोबाइलवरून संदीप जगताप याला १२ वेळा कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
- यावरून पोलिसांनी चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतले. सुमितच्या वडिलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे विमा पॉलिसीचे लाखो रुपये मिळाले होते, ते पैसे त्याने व्यसनात गमावले होते.
- त्यानंतरही तो घरातील वस्तु, अन्नधान्य विकत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संगनमताने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.