रुपेश उत्तरवार यवतमाळमानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असा संदेश प्रभू यशूने दिला. ईश्वराचे हे विचार जनमानसात कृतीतून उतरविण्यासाठी ख्रिस्त बांधव अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. दुखितांचे अश्रू पुसण्यासाठी ते काम करीत आहेत. चांगल्या कार्याची प्रेरणा चर्चमधूनच मिळते. ती मातृचर्च शतकाच्या उंबरठ्यार पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यात साधारणत: २५ चर्च आहेत. यवतमाळातील मातृचर्च सर्वात जुना चर्च म्हणून ओळखला जातो. यामुळे सर्वाधिक समाजबांधव याच चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. या चर्चला ऐतिहासिक महत्त्व आहे. ४ फेब्रुवारी १९१६ रोजी या चर्चची स्थापना झाली. या चर्चला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. संपूर्ण कालखंडात झालेले फेरबदल चर्चने जवळून अनुुभवले आहे. या ठिकाणी इमारतीवर सर्वात मोठी प्रेअर बेल बसविण्यात आली होती. ही बेल इंग्लंडवरून आणण्यात आली होती. प्रार्थनेपूर्वी ही बेल वाजविली जात होती. त्याचा आवाज लगतच्या परिसरातच नव्हेतर तब्बल २१ किलोमीटर दूरपर्यंत पोहोचत होता. चर्चवरची बेल सर्वांच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू होती. ती बेल चर्चच्या प्रवेश द्वारावर बसविण्यात आली आहे. दर रविवारी विशेष प्रार्थना होते. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मिशनचा उमरीला दवाखाना आहे. नाममात्र शुल्कामुळे ग्रामीण भागातील रूग्ण या दवाखान्यात मोठ्या संख्येने धाव घेतात. उमरीमध्ये दी ख्रिश्चन सेन्ट्रल हायस्कूल अॅण्ड प्रायमरी स्कूल आहे. त्या ठिकाणी दहावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी इंग्रजी कॉन्व्हेंट आहे. चर्चचे फादर रेव्हरंट फिलेमोन डेव्हीड म्हणाले, सेवा हा आमचा प्राथमिक उद्देश आहे. आध्यात्मिक जीवनात ऱ्हास होऊ नये, टिकवून राहावे याकरिता कुटुंबात प्रेम, शांती आणि सद्विचारांचा संदेश दिला जातो. संकटांवर मात करण्यासाठी मातृचर्चमध्ये प्रार्थना होते.
शतकाच्या उंबरठ्यावर मातृचर्च
By admin | Published: December 25, 2015 3:24 AM