अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या आजारावर ना कोणते औषध, ना कोणती गोळी निघाली. जेव्हा संकटात अशी सगळी दारं बंद होतात, तेव्हा माणूस देवाच्या आणि त्याही आधी आईच्या आसऱ्याला जातो. किंबहुना आईलाच देव मानून तिच्यापुढेच करुणेचा पदर पसरतो. म्हणूनच जिल्ह्यात आजही गावोगावी 'आईचे देऊळ' उभे आहे. भलेही त्याचे खांब कलथून गेले असतील, भिंती खचल्या असतील... पण आईचे देऊळ अन् त्यात गावकऱ्यांनी जपलेली श्रद्धा अढळ राहिली आहे. कोरोनाच्या या आधुनिक संकटातही लोक या 'मायदेवीला पाणी वाहून तीर्थ घेत असल्याचे' वास्तव आहे.रविवारी जगभरात 'मदर्स डे' साजरा होतोय. मातृदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गावखेड्यांनी जपलेली आईची देवळं आणि त्याभोवतीचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न.पूर्वी वैद्यकशास्त्र फारसे प्रगत नव्हते. स्वातंत्र्योत्तर काळात कांजिण्या, गोवरसारख्या आजारांनी गावांना विळखा घातला होता. तेव्हा तालुक्याच्या पातळीवरही फारसे डॉक्टर नव्हते. जे होते, त्यांना बैलबंडीत बसवून गावात आणावे लागे. अशावेळी खेड्यात घरोघरी रुग्ण असताना इलाज तरी किती होणार? मग खेड्यातला माणूस साहजिकच देवाच्या आहारी गेला. दरवर्षी कुठला ना कुठला आजार, कुठली ना कुठली साथ यायचीच. कधी गोवर, कांजिण्या, तर कधी प्लेग. अशावेळी प्रत्येक रुग्णाला सांभाळून घेणाऱ्या, त्यांची घरातल्या घरात शुश्रूषा करणाऱ्या महिलाच होत्या; पण देवभिरू गावकऱ्यांनी संपूर्ण गावच साथमुक्त राहावे म्हणून देवाला साकडे घातले अन् संपूर्ण गावच निरोगी राहावे म्हणून गावाच्या वेशीवर 'आईचे देऊळ' उभारले. साध्या चार डेळी गाडून, दोन टिनपत्रे टाकून ही मंदिरे उभी राहिली. कुठे-कुठे पक्के बांधकामही दिसते. वषार्नुवर्षे ही मंदिरे उभी आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही खेड्यात जा, वेशीवर ते दिसतेच. आताही मंदिरे पडकी, भग्न झाली असली तरी उभी आहेत. गावातली माणसे शिकली सवरली; पण या आईच्या देवळावरची त्यांची श्रद्धा मात्र अबाधित आहे. म्हणूनच गावोगावच्या आईच्या देवळांचा अलीकडे जीर्णोद्धारही होऊ लागलाय.आईची 'न्हाउनी' वाटते औषधगावात कुठलीही साथ आली की गावकरी 'आईच्या देवळा'त समूहाने जातात. आईच्या मूर्तीला पाणी वाहतात. ते तीर्थ गोळा करून घरी आणतात. आजारी माणसाला देतात. त्यालाच गावकरी 'न्हाउनी घेणे' असेही म्हणतात. ते घेतल्याने आजार पळतो अशी श्रद्धा आहे. आजही कोरोनाच्या साथीत अनेकांची पावलं आईच्या देवळांकडे घुटमळत आहेत. दवाखान्याशिवाय कोरोना जाणार नाही, हे माहीत असूनही गावकरी आईच्या मूर्तीर्पुढे नतमस्तक होत आहेत. कारण तिथे औषध नसले तरी आत्मिक समाधान कदाचित मिळत असावे. महाराष्ट्र पूवीर्पासूनच मातृसत्ताक पद्धती मानणारा आहे. म्हणूनच गावोगावी आईचे देऊळ आहे. अडचणीत कधीकधीच माणूस 'बापरे' उद्गारतो; पण जिवावरचे संकट आले तर 'आई गं' हाच निवार्णीचा उच्चार असतो.गाव तसे नाव... कार्यात आईच्या चरणी पहिला भावगावदेवी, मरीमाय, खोकला माय अशा वेगवेगळ्या नावाने गावागावांत आईचे देऊळ उभे आहे. अनेक गावांत त्याला 'आईचे घर'ही म्हटले जाते. गावात कुणाकडे लग्नकार्य असल्यास पूजेचा पहिला मान या आईलाच दिला जातो. लग्नाचा मांडव टाकण्यापूर्वी लाकडाची आईची मूर्ती घडविली जाते. तिला हळद लावली जाते. नंतर लिंबाचा पाला अन् ज्वारीच्या ढेगावर ही मूर्ती ठेवून लग्नघरातील संपूर्ण महिला वाजतगाजत या मंदिरात जाऊन तेथे नव्या मूतीर्ची प्रतिष्ठापना करतात. या प्रथेला 'हळद फिरविणे' म्हणतात. त्यामुळेच आईच्या देवळात आज अनेक मूर्ती पाहायला मिळतात. पावसाळ्यापूर्वी गावातील महिला समूहाने मंदिरात जाऊन आई देवीला पाणी वाहिले जाते. दही-भात शिंपतात. पावसाळ्यात पावसाने खंड दिला तर याच देवळातून 'धोंडी' काढली जाते. नंतर ती घरोघर फिरते. ज्या गावात जशी साथ आली, तसे या देवीचे नामकरण होते. शिरोली नावाच्या खेड्यात आजही 'खोकला माय'चे मंदिर आहे. ताप-खोकल्याचा आजार आला की या देवीची पूजा केली जाते. अशा गावोगावच्या आईच्या देवळाच्या कहाण्या आहेत.
मदर्स डे स्पेशल; 'या' प्रदेशात गावोगावी आहे 'आईचे देऊळ'!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 7:00 AM
Yawatmal news रविवारी जगभरात 'मदर्स डे' साजरा होतोय. मातृदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गावखेड्यांनी जपलेली आईची देवळं आणि त्याभोवतीचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न.
ठळक मुद्देगावखेड्यांचा आधारस्तंभडॉक्टरच्याही आधी आईवर भरवसा