शिवसेनेचा रास्ता रोको : सोमवारपासून खरेदी सुरू करण्याचे तहसीलदारांचे आश्वासनआर्णी : शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे आर्णीमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू करावी या मागणीसाठी शिवसेनेने बायपासजवळ शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. शिवसैनिकांनी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात बायपासजवळ तब्बल तीन तास वाहतूक अडवून धरली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शासकीय कापूस खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार तुंडलवार घटनास्थळी पोहोचले त्यांनी तहसीलदार सुधीर पवार यांना सूचना दिली. त्यानंतर यवतमाळवरून ताबडतोब आले व त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर बोलून सोमवारी आर्णी व लोणबेहळ या दोन ठिकाणी शासकीय खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रवी राठोड, संजय उपलेंचवार, राहुल लाभशेटवार, उत्तम राठोड, रामेश्वर जाधव, राजू भारती, गुड्डु वानखडे, विजय राठोड, गजू मार्लेवार, स्वप्नील राऊत, रवी खोपे, घनश्याम कापसे, रामेश्वर मानकर, आनंदा वाघाट, तुषार ढोले, रक्षक भालेराव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
कापूस खरेदीसाठी आर्णी येथे आंदोलन
By admin | Published: November 22, 2015 2:45 AM