यवतमाळ : दिवाळीच्या दीर्घ सुट्यानंतर आलेल्या पहिल्या सोमवारी जिल्हा कचेरीसह विविध कार्यालयांना आंदोलकांचा सामना करावा लागला. शिक्षक, पोषण आहार कामगार, शेतकरी आणि वाहतूकदारांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. बोरीअरब येथे संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबले तर आर्णी येथे दुष्काळ घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यवतमाळच्या जिल्हा कचेरीसमोर शिक्षकांनी खिचडी शिजवून अभिनव आंदोलन केले. चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे आत्महत्याप्रकरणी शिक्षक व कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. आत्महत्याप्रकरणी पीआरसी सदस्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अमरावती जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, मुख्यमंत्री सहायता निधीतून मुख्याध्यापक विजय नकाशे यांना २५ लाख मोबदला देण्यात यावा या मागण्यांसह शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजूदास जाधव, महाराष्ट्र प्रदेश केंद्र प्रमुख संघाचे राज्य सरचिटणीस जयवंत दुबे, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघाचे अध्यक्ष शहाजी घुले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस मधुकर काठोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत धुळे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत मोहुर्ले, कैलास राऊत यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.पोषण आहार कामगारांंचा ठिय्यापोषण आहार शिकजविणाऱ्या कामगारांंना दरमहा वेतन देण्यात यावे, किमान वेतन कायद्यानुसार १५ हजार रुपये वेतन द्या, मानधन व इंधन बिल जिल्हास्तरावरून थेट स्वयंपाकी व मदतनिसांच्या खात्यात जमा करावे या मागण्यांसाठी राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, जिल्हा सचिव संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, माया मानकर, सुचिता पाईकराव आदींसह शेकडो कामगार उपस्थित होते. शेतकरी धडकले वीज कंपनीवर वीज भारनियमनाने वैतागलेले शेतकरी सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारून रात्री अपरात्री ओलित कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज देण्याची मागणी बोथबोडनसह इतर गावातील शेतकऱ्यांनी केली. खिचडी शिजली रस्त्यावर ४सेमाडोह येथील शिक्षक विजय नकाशे आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी संघाच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रस्त्यावर खिचडी शिजवून अभिनव निषेध नोंदविण्यात आला. पीआरसी भेटीत ३० किलो तांदूळ कमी आढळल्याने अपमानास्पद बोलणी खावी लागल्याने नकाशे यांनी आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर शिक्षकांची चक्क खिचडी शिजविली. यावेळी विजय नकाशे यांचे गळफास घेतलेल्या अवस्थेतील फ्लेक्स लावले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव आंदोलन शिक्षकांनी केले. शिक्षकांकडे शाळा इमारत बांधकाम, जनगणना, दुष्काळग्रस्तांची माहिती गोळा करणे आदी कामे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षक मानसिक तणावात येत आहे.
आंदोलने
By admin | Published: November 17, 2015 4:00 AM