उमरखेड (यवतमाळ) : आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या मराठा समाज बांधवांनी रविवारी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून राजीनाम्याची मागणी लावून धरली. यावेळी आपणही आरक्षणाच्या बाजूचेच आहोत, असे म्हणत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीरामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठविला.
हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हेमंत पाटील हे रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी पोफाळी (ता. उमरखेड) येथे काही कामानिमिताने आले होते. त्यावेळी मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवून घेराव घातला. आधीच गावागावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावांच्या वेशीवर त्याबाबतचे बॅनरही लावण्यात आले आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीने उमरखेड येथे गेल्या शनिवारपासून उपोषण सुरू आहे.
अशावेळी खासदार पोफाळीत आल्याचे समजताच समाज बांधवांनी त्यांना घेराव घालून राजीनामा देण्याची मागणी केली. त्यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी समाज बांधवांपुढेच आपल्या खासदारकीचा राजीनामा लिहिला आणि तातडीने लोकसभा अध्यक्षांकडे रवाना केला. तसेच येत्या दोन दिवसात आपण स्वत: दिल्ली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून राजीनामासत्र सुरू आहे. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी दोन दिवसांपूर्वीच आपापल्या वरिष्ठांकडे राजीनामे दिले आहेत.