विलास गावंडे
यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही संप मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता इतर पर्यायांवर महामंडळाने विचार सुरू केला आहे. महामंडळातील सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेण्यात येणार असून, एसटीच्या राज्यभरातील ३१ विभागांकरिता तीन हजारांवर कर्मचारी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा ७३ वा दिवस ओलांडला आहे. महामंडळ, शासन आणि कर्मचारी संघटनांच्या आवाहनाला संपकरी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. शासनाच्या म्हणण्यानुसार ऐतिहासिक पगारवाढही देऊ करण्यात आली. परंतु कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
दुसरीकडे नागरिकांची खासगी वाहनधारकांकडून बेसुमार आर्थिक लूट सुरू आहे. बसण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी म्हणून महामंडळाने पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहे. नागरिकांचीही हीच अपेक्षा आहे. त्यामुळे महामंडळातून निवृत्त झालेल्या लोकांची साथ घेतली जात आहे.
इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यांना दरमहा २० ते २१ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. याशिवाय चालक-वाहक उपलब्ध करून देण्यासाठी बाह्य स्रोतांचीही नियुक्ती केली जात आहे. विविध अटी-शर्ती टाकून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
वाहकांचा अधिक तुटवडा
महामंडळाचे काही कर्मचारी कामावर रुजू होत आहे. यात चालकांचाही समावेश आहे. परंतु बहुतांश ठिकाणी वाहकांचा तुटवडा आहे. तिकीट फाडण्यासाठीचा अनुभव असलेला व्यक्ती महामंडळाला पाहिजे आहे. यासाठी अधिक प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जाते.
यवतमाळात २० अर्ज
करारावर सेवा देण्यासाठी यवतमाळ येथे काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. आतापर्यंत २० कर्मचाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे. त्याची छाननी करण्यात येत आहे. एजन्सीच्या माध्यमातून कर्मचारी घेतले जाणार असल्याची माहिती यवतमाळ विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.