उत्पादन विक्रमी : दर मात्र हमीभावापेक्षाही कमीअखिलेश अग्रवाल पुसदगतवर्षी दुष्काळाने मुगाचे भाव गगनाला भिडले होते. यावर्षी मात्र रिमझिम पावसावर मुगाचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र आता बाजारात मात्र मूगाची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. हमी भावापेक्षाही कमी दराने मुगाची विक्री होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.मुगाचा हमी भाव पाच हजार २२५ रुपये प्रतिक्विंटल असून खुल्या बाजारात मात्र व्यापारी चार हजार ते पाच हजार या दराने मूग विकत घेत आहे. गत वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मुगाचे उत्पादन घटले होते. त्यामुळे मुगाचे भावही सात हजार ते आठ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले होते. त्यातच डाळीचे भावही १०० रुपये किलो झाले होते. तर तूरडाळ गतवर्षी २०० रुपये किलो झाल्यामुळे मुगाच्या डाळीचे भावही गगनाला भिडले होते. यावर्षी पाऊसही चांगला झाला व डाळीला भाव चांगले मिळत असल्यामुळे डाळवर्गीय पिकांच्या पेऱ्यातही वाढ झाली आहे. आता नवा मूग बाजारात येत असून मागील वर्षीपेक्षा निम्या किमतीत मूग विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या बाजारात नव्या मूगाला खुल्या बाजारात व्यापारी चार हजार ते साडेचार हजार या भावाने खरेदी करीत आहे. सर्रासपणे हमीभावापेक्षा कमी भाव मूगाला मिळतो आहे. त्यामुळे केंद्राने जाहीर केलेले मूगाचे हमीभाव शेतकऱ्यांसाठी केवळ आशेचे गाजर ठरले आहे. या सर्व प्रकाराने मूग उत्पादक शेतकरी मात्र चांगलेच हवालदिल झाले आहे.
मुगाला कवडीमोल भाव
By admin | Published: September 22, 2016 1:45 AM