यवतमाळ : जिल्ह्यात वाघांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एक तरी वाघ दिसावा म्हणून हौशी पर्यटक दूरच्या ताडोबामध्ये जातात. पण, यवतमाळच्याच पैनगंगा अभयारण्यात (ता. उमरखेड) सोमवारी चक्क वाघ-वाघिणीचे जोडपे पाहायला मिळाले.
पांढरकवडाच्या टिपेश्वर अभयारण्यातील या वाघांनी उमरखेडचे पैनगंगा अभयारण्य गाठले. खरबी वनपरिक्षेत्रात सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वन कर्मचारी अश्विन मुजमुले, एस. आर. बोंबले, एस. एल. कानडे, विजय टोंगळे गस्त घालत होते. त्यावेळी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले आणि हा दुर्मीळ क्षण कॅमेराबद्ध झाला.
अभयारण्यातील हिरवळ, पाणवठ्यांवर हे वाघ मुक्तपणे विहार करीत आहेत. या दोन वाघांसह आणखी एक वाघ पैनगंगा अभयारण्यात आहे. त्यामुळे, खरबी रेंजमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शेतकरी, मजुरांनी जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. या अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची मागणी प्रलंबित आहे. मात्र, वाढलेल्या वाघांचे हे 'पुरावे' या प्रलंबित असलेल्या मागणीला पाठबळ देत आहेत.