प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सोशल मीडियात जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पाहायला मिळतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्रस येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या तेजस गजानन काळे याने प्रत्यक्षात उतरविली. टाकाऊ वस्तूंपासून त्याने बहुपर्यायी व बहुपयोगी फवारणी यंत्र तयार केले. नाशिक येथे झालेल्या जागतिक कृषी महोत्सवात त्याच्या या फवारणी यंत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.तेजस हा येथील दीनबाई विद्यालयात नवव्या वर्गात शिकतो. काही तरी नवीन करण्याच्या धडपडीतून त्याने फवारणी यंत्र तयार केले. यासाठी तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लास्टिक कॅन, प्लास्टिक नळी, नोझल, पिस्टन सारखे साहित्य वापरले. याद्वारे त्याने फवारणी यंत्र तयार केले. हाताळायला अतिशय सोपे आणि कुणीही वापर करू शकेल असे हे यंत्र आहे. विशेष म्हणजे हे यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे विषबाधाही टाळता येऊ शकते. तेजसच्या या फवारणी यंत्राची चर्चा तालुक्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर पोहोचली आहे. नाशिक येथे झालेल्या जागतिक कृषी महोत्सवात सदर फवारणी यंत्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शेतकरी कुटुंबातील तेजसने तयार केलेले हे यंत्र सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तेजसचे हे जुगाड तंत्रज्ञान पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची शेतात गर्दी होत असते.शेतकऱ्यांची विषबाधेपासून मुक्तीतेजस तयार केलेले हे फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. समोर ढकलत चालावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाही. गत हंगामात अनेक शेतकऱ्यांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. तेजसच्या या यंत्राने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या यंत्राच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही अल्प आहे. त्याच्या या संशोधनाचा गौरव म्हणून अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तेजसने तयार केले बहुपर्यायी फवारणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 9:58 PM
सोशल मीडियात जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पाहायला मिळतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्रस येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या तेजस गजानन काळे याने प्रत्यक्षात उतरविली. टाकाऊ वस्तूंपासून त्याने बहुपर्यायी व बहुपयोगी फवारणी यंत्र तयार केले. नाशिक येथे झालेल्या जागतिक कृषी महोत्सवात त्याच्या या फवारणी यंत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
ठळक मुद्देजुगाड टेक्नॉलॉजी : नाशिकच्या कृषी महोत्सवात दिग्रसच्या विद्यार्थ्याने वेधले लक्ष