यवतमाळ : राज्य सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सक्षम व्यक्तीचा शोध घेता यावा याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा संचालकांनी बँकेच्या पैशाने मुंबईवारी केली. गुरुवारीच हे संचालक यवतमाळात परतले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही महिन्यांपासून सोईच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा (सीईओ) शोध सुरू आहे. बँकेच्याच सरव्यवस्थापकांना सीईओंचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या ‘मोडेल पण वाकणार नाही’ या कार्यपद्धतीमुळे संचालकांना ते गैरसोईचे वाटू लागले. त्यातूनच त्यांच्याकडील प्रभार काढून घेतला गेला. आता बँकेने नव्या सोईच्या सीईओंची शोधाशोध चालविली आहे. राज्य सहकारी बँकेत एखादा सोईचा सीईओ मिळतो का याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी बँकेच्या दहा संचालकांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईवारी केली. एकीकडे खासगी कामासाठी संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून ६० लाखांचा खर्च केल्याचा खटला उच्च न्यायालयात पोहोचला. त्याची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांपुढे झाली. मात्र त्यानंतरही संचालकांची बँकेच्या तिजोरीतून उधळपट्टी सुरूच आहे. सीईओंच्या शोधासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल दहा संचालकांनी मुंबईवारी करण्यामागील कोडे बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही अद्याप उलगडलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
सीईओंसाठी बँकेच्या १० संचालकांची मुंबईवारी
By admin | Published: February 06, 2016 2:34 AM