वणी (यवतमाळ) : दुसऱ्या पत्नीवर केल्या जाणाऱ्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पहिल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचे प्रेत गीट्टी खाणीच्या खड्ड्यात फेकून दिले. या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी संशयित आराेपीला बुधवारी दिल्लीतून ताब्यात घेतले.
६ सप्टेंबरला शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील गिट्टी खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात एका महिलेचे प्रेत आढळून आले होते. सरिता लालबाबू पंडित ऊर्फ सरिता राजन पंडित असे मृत महिलेचे नाव आहे. ती बिहार राज्यातील विसपट्टी येथील रहिवासी होती. ६ सप्टेंबरला सकाळी तिचा मृतदेह मोहदा येथील खाणीच्या खड्ड्यात आढळून आला. एकूण परिस्थिती लक्षात घेता, तिचा खूनच करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या घटनेपासूनच तिचा पती राजन रामचित पंडित (२१) हा मोहदा येथून फरार होता.
पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. सरिताचा मारेकरी हा तिचा पतीच असल्याची शंका पोलिसांना आल्याने पोलिसांनी राजन पंडितचा शोध सुरू केला. तो दिल्लीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, शिरपुरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, नायक पोलिस सुगत दिवेकर, पोलिस शिपाई विनोद मोतेवार हे दिल्लीकडे रवाना झाले.
तेथे अनेक ठिकाणी शोध घेतला. अखेर बुधवारी त्याला दिल्लीतील जैतपूर भागातून ताब्यात घेतले. गुरूवारी त्याला दिल्ली येथून शिरपूर येथे आणण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दुसरी पत्नी होती गर्भवती, पहिलीकडे दुर्लक्ष
राजन रामचित पंडित हा त्याच्या पहिल्या पत्नीसह मोहदा येथील गीट्टी खाणीत कामाला हाेता. याचदरम्यान त्याने दुसऱ्या एका महिलेशी लग्न केले. या दोघींनाही घेऊन तो मोहदा येथे राहत होता. यादरम्यान, त्याची दुसरी पत्नी गर्भवती होती. त्यामुळे राजन तिची अधिक काळजी घेऊ लागला. हीच बाब सरिताला खटकत होती. यातून दोघांमध्ये वाद होत होते. घटनेच्या दिवशीही याच विषयावरून दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले.