यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बुधवारी रात्री एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याचा निर्घृण खून झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त करीत रुग्णालयाचे कामकाज बंद पाडले. पोलिसांनी दोन संशयितांना रात्रीच अटक केली. मात्र, गुरुवारी विद्यार्थ्यांच्या प्रचंड आंदोलनानंतर अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला. अशोक सुरेंद्र पाल (२४, रा. कोपरा बावडी, जि. ठाणे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ग्रंथालयातून होस्टेलकडे जात असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर वार केले. तो कोसळला. अशोकला रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
जुन्या भांडणाचा वचपा?महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी तक्रार दिली. आकाश दिलीप गोफणे (२१), तुषार शंकर नागदेवते (२४, दोघे रा. वाघापूर) व त्यांच्या साथीदारांनी जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी खून केला असे तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी लगेच दोघांनाही अटक केली.
मंत्री देशमुख यांनी मागविला अहवालया घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. तसेच अधिष्ठाता यांना तातडीने अहवाल मागितला. तसेच घटनेबद्दल मंत्र्यांनी शोक व्यक्त केला.
अधिष्ठातांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही. त्यामुळेच हे घडले. २४ तासात आरोपींना अटक न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवू.- डाॅ. अनुप शाह, अध्यक्ष, मार्ड, यवतमाळ
सुरक्षा वाढविण्यात येईल, सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे लावले जातील. - डाॅ. मिलिंद कांबळे, प्रभारी अधिष्ठाता