यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरची बुधवारी हत्या झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेनंतर महाविद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, डॉक्टर आक्रमक झाले असून त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं आहे. या हत्येमागचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. तर, काल झालेल्या हत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला असून विद्यार्था आक्रमक झाले आहेत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेत शिकावू डॉक्टरांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. त्यामुळे मेडिकल आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.