उमरखेड (यवतमाळ) - चातारी येथे उसणे दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून 23 वर्षीय तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळी बसस्थानक परिसरात ही घटना घडली. योगेश शिवाजी कुंबलवाड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी चातारी येथील बसस्थानक परिसरात योगेश हा आरोपी राजू उर्फ मारोती साहेबराव भोयर (23) याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत आरोपी राजूने योगेशचा गळा दाबला तसेच नाकावर मारलं. यामुळे योगेश जमिनीवर कोसळला. या दरम्यान संतोष पवार व निखिल कुंबलवाड हे दोघे घटनास्थळी पोहोचले. मात्र तत्पूर्वीच आरोपी राजूने योगेशला दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेण्याचे नाटक केले.
दरम्यान योगेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत योगेशचे काका गणपत कुंबलवाड यांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी राजू भोयर याला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय महेश घुगे, कॉन्स्टेबल हेमंत बंडकर पुढील तपास करीत आहे.
उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे युवकाचा खून
अहमदनगरमध्ये उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून बाळू बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्याची घटना घडली आहे. खर्डा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास बार्शी येथे दाखल केले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व राहणार खर्डा) या पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले. मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल आहे.