सावळी सदोबा (यवतमाळ) : पारवा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आयता येथील योगेश जोगमोडे या युवकाचा शेतीच्या वादातून झालेल्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता मृत योगेशच्या वडिलांनी राजकीय वर्चस्वातून आपल्या मुलाचा बळी गेल्याचा आरोप रविवारी पत्रपरिषदेतून केला. दरम्यान, पोलिसांनी आणखी तीन संशयितांना अटक केल्याने आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
आयता येथे सोमवार, १० एप्रिल रोजी योगेशला जबर मारहाण करण्यात आली होती. त्याचे वडील अशोकराव जोगमोडे यांच्या जबाबावरून या मृत्यू प्रकरणातील राजू पंजवाणी (रा. आयता) याला शनिवारी, तर सचिन दिलीप राठोड आणि नितेश रामचंद्र चव्हाण दोघेही (रा. अंतरगाव) यांना आधीच अटक करण्यात आली होती. यातील राजू पंजवाणी (रा. आयता) याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
या प्रकरणातील सहा आरोपींना यापूर्वी न्यायालयीन कोठडीत तर ५ आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पारवा पोलिसांनी दिली. मृत योगेशच्या वडिलांच्या जबाबावरून राजू पंजवाणी याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. आयता येथे दोन गट आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटांकडून नेहमीच राजकीय वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र, या राजकीय वर्चस्वाची तिळमात्र भनक नसलेल्या योगेशचा नाहक बळी गेल्याची खंत वडिलांनी व्यक्त केली.
योगेशला सामाजिक कार्याची आवड होती. तो नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेत होता. मात्र, गावातील काही राजकारणी लोकांना हे खटखटत होते. त्यामुळे योगेशला मारण्यासाठी अनेकदा कटकारस्तान रचण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंदिराच्या शेतीचा वाद समोर करून माझ्या डोळ्यासमोर मुलाच्या डोक्यावर बेदम मारहाण करून त्याला ठार मारण्यात आरोपी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मृत योगेशला झाला मुलगा
योगेश याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर रविवारी त्याच्या पत्नीला प्रसव कळा सुरू झाल्या. तिला तातडीने यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात तिने गोंडस बाळाला जन्म दिला.
आयता गावात दोन गट आहेत. मृत योगेश जोगमोडे यांचे वडील अशोक जोगमडे यांचा एक गट असून दुसरा गट आरोपींचा असल्याने त्यांच्यात रामनवमी, पुंडलिकबाबा यात्रा, कबड्डी सामने, हनुमान मंदिराच्या शेतीविषयात कधीच एकमत होत नव्हते. त्यामुळे दोन्ही गटांत वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होत होता. अशातूनच हा प्रकार घडला असावा.
- गजानन गजभारे, सहायक पोलिस निरीक्षक, पारवा.