लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना काळात यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेऊन जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार वाढत आहेत. अशातच प्रशासनाला एका बालविवाहाची अज्ञाताने टीप दिली. यंत्रणा थेट मांडवात धडकली अन् चक्क दोन कोवळ्या कळ्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. मंगलाष्टकांपूर्वीच पोलीस धडकल्याने वऱ्हाड्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
नाणंद या छोट्याशा गावात बुधवारी या दोन बालविवाहांची पूर्ण तयारी झाली होती. लग्न मंडप सजलेला होता, दोन्ही लग्नाचे वºहाडी हजर होते, स्वयंपाकाची तयारी जोरात सुरू होती. लग्नाची लगबग सुरु होती. अशातच एका सुज्ञ नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईनवर माहिती दिली. लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, खंडाळा पोलीस व चाईल्ड लाईन टिम गावात दाखल झाली. एक बालविवाह थांबविण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चक्क दोन बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले व वयाची शहानिशा करण्यात आली. यातील एक १४ वर्षीय बालिका व दुसरी १५ वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र दोन्ही बालविवाहांचा डाव प्रशासनाने उधळला. दोघींच्याही पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी अल्पवयीन बालिकांना ताब्यात घेवून त्यांना बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात आले. तसेच दोन्ही नवरदेव व मध्यस्थी नातेवाईकांना तंबी देण्यात आली.
ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुरेर्वार, श्याम राठोड, बाळू आडे, प्रभारी ठाणेदार रवींद्र मस्कर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन गोमाजी राठोड, पोलीस नाईक सचिन दतात्रय राऊत, होमगार्ड सुभाष धोमनार, चाईल्ड लाईन प्रतिनिधी योगेश मेश्राम, शितल काटपेल्लीवर, पोलीस पाटील सिंधू खुडे, आशासेविका कौशल्या मार्कड, अंगणवाडीसेविका वनमाला खडसे, गावातील प्रतिष्ठित नागरिक शेषराव डाखोरे, रमेश राठोड यांच्या उपस्थित पार पडली.यवतमाळातील २० वा विवाहलॉकडाऊन आणि कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा बालविवाहांसाठी घेतला जात आहे. तसेच सध्या कमीत कमी खर्चात विवाह होतो म्हणून ग्रामीण भागात लगीनघाई दिसत आहे. मार्च ते सप्टेंबरपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात १८ बालविवाह माहिती मिळाल्याने रोखण्यात आले. बुधवारी त्यान दोन विवाहांची भर पडली. मात्र माहिती न मिळालेल्या विवाहांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.बालविवाहाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे. बालविवाहबाबत माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड लाइनच्या १०९८ क्रमांकावर माहिती द्यावी.- ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ