आॅनलाईन लोकमतयवतमाळ :जातीत कोणत्या घेणार नोंद माझी,डोक्यात भीम माझ्या,रक्तात शिवाजीअशा परिवर्तनवादी ओळींचा घोष करीत सोमवारी यवतमाळात भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला. भीमा कोरेगाव शौर्यदिनाला दोनशे वर्षे झाल्याच्या निमित्ताने सकाळी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा चौकात सभाही पार पडली.भीमा कोरेगाव शौर्यगाथा समितीच्या वतीने सकाळी तरुणांनी वडगाव रोडवरील नागभूमी येथून बाईक रॅली काढली. आर्णी नाका, दाते महाविद्यालय चौक, वीर वामनराव चौक, अँग्लो हिंदी चौक, जाजू चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक, पाचकंदिल चौक, हनुमान आखाडा, पोस्ट आॅफिस चौक, एलआयसी चौक अशा मार्गाने या रॅलीचे मार्गक्रमण झाले.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनेही भिमा कोरेगावच्या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी बाईक रॅली काढली. बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच भीमा कोरेगाव स्तंभाला हारारार्पण व अभिवादन करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातून विविध मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. यात उत्सव समितीचे पाटीपुरा, तलावफैल, गौतमनगर, बांगरनगर, महामायानगर, पिंपळगाव, वाघापूर, वैशालीनगर, नेताजीनगर, लोहारा, वडगाव, मुल्की, उमरसरा, विदर्भ हाउसिंग सोसायटी, जामनकरनगर, भोसा, पारवा, भारी आदी ठिकाणांहून नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. निळे फेटे घातलेले तरुण आणि हाती घेतलेल्या निळ्या झेंड्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.तिरंगा चौकात भीमा कोरेगाव शौर्यगाथा समितीच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये बाळासाहेब गावंडे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज आपल्या देशात समाजवादावर साम्राज्यवादाने हल्ला केलेला आहे. त्यामुळे आता काठावर राहून चालणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन साम्राज्यवादाला रोखण्याची गरज आहे. भिमा कोरेगाव येथे अभूतपूर्व लढा देण्यात आला. तसाच संग्राम करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. आज इव्हीएम मशीनमधून निवडणुका जिंकल्या जात आहे. कुणीतरी अनंत हेगडेसारखा खासदार संविधानाविषयी बरळतो. विजय मल्ल्यासारख्यांना सोयीची वागणूक दिली जात आहे. या सर्वांचा एकजुटीने विरोध केला पाहिजे.तर सूरज खोब्रागडे म्हणाले, भिमा कोरेगाव शौर्यदिन हा आता कोणत्या एका जातीच्या लोकांचा विषय राहिलेला नाही. सर्वच जातीचे लोक एकत्र येऊन हा शौर्यदिन साजरा करीत आहे. विशिष्ट लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्या डोक्यात भीम आहे तर रक्तात शिवाजी आहे. त्यामुळे आम्हाला आता कोणत्या जातीत बांधणेच शक्य नाही. या कार्यक्रमात बाळासाहेब गावंडे, सूरज खोब्रागडे, विपीन कवाडे, अनिरुद्ध कांबळे, नीलेश मेश्राम, प्रशिक रामटेके, समीर जाधव, स्वप्नील मानवटकर, राहुल लांजेवार, शुभम अडावू, सूरज भितकर, उमेश दातार, स्वप्नील दिघाडे, अंकुश फुलझेले, सिद्धार्थ मेश्राम, अजय दहीकर, स्नेहल रामटेके उपस्थित होते.भीमा कोरेगावच्या संग्रामाची द्विशताब्दी१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रजांच्या लष्करातील महार (नागवंशीय) सैनिकांच्या छोट्या तुकडीने पुण्याजवळच्या भिमा कोरेगाव येथे बाजीराव पेशव्यावर आक्रमण करून २५ हजार सैनिकांना पराजित केले. त्या ठिकाणी इंग्रजांनी विजयी क्रांतीस्तंभ उभारला. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येऊन महार योद्ध्यांना मानवंदना दिली. नष्ट होऊ पाहणारा इतिहास त्यांनी जिवंत केला. तेव्हापासून १ जानेवारीला भिमा कोरेगाव शौर्यदिन साजरा केला जातो. यंदा भिमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त यवतमाळात ३, ४ व ५ जानेवारीला विशेष समारोह होत आहे.उद्यापासून यवतमाळात स्मृती समारोहभिमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यवतमाळात ३ जानेवारीपासून समता मैदानात द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. संविधानिक विचार मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती तथा आंबेडकरी कवी-गायक बहुउद्देशीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाºया या समारोहात ‘भिमा कोरेगाव संग्राम इतिहास’, ‘बौद्धांच्या समरगाथा’, ‘आंबेडकरी आंदोलनाची दिशा’ आदी विषयांवर व्याख्याने होणार आहेत. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी राहणार आहे.
डोक्यात भीम माझ्या, रक्तात शिवाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:33 AM
जातीत कोणत्या घेणार नोंद माझी, डोक्यात भीम माझ्या, रक्तात शिवाजी अशा परिवर्तनवादी ओळींचा घोष करीत सोमवारी यवतमाळात भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देतरुणांची बाईक रॅली : भीमा कोरेगाव शौर्यगाथेचे द्वि-शताब्दी वर्ष