प्रकाश सातघरे।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली. माता व दोन्ही चिमुकल्यांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात दारव्हा तालुक्यातील हातणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांना निरोप देताना अवघे गाव हळहळत होते.तालुक्यातील मांडवा येथील दिव्यांग शेतमजूर प्रेमसिंग पवार यांची कन्या कल्पना हिचा विवाह २०११ मध्ये दारव्हा तालुक्यातील हातणी येथील अंकुश राठोड याच्यासोबत झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली होती. युवराज हा अवघा पाच वर्षाचा तर मुलगी गुड्डी अवघी तीन वर्षांची होती. मुलांच्या जन्मानंतर काही काळातच कल्पनाला सासरच्यांनी त्रास देणे सुरू केले. तिला वारंवार मारहाण केली. अशातच तिच्या माहेरच्यांना पैसे मिळाले. त्यापैकी ८० हजार रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी कल्पनाच्या मागे तगादा लावला. त्यापैकी ४० हजार रुपये कल्पनाने आणून दिले. उर्वरित ४० हजारांसाठी पुन्हा तिचा छळ सुरू झाला. ३० मे रोजी कल्पनाने आईला फोन करून माहिती दिली. तिची आई हातणी येथे पोहोचली. तिने कल्पना व मुलांना मांडवा येथे आणले. आजी-आजोबा व आईसोबत दोन्ही चिमुकले आनंदाने झोपी गेले. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळीच कल्पनाने युवराज व गुड्डीला घेऊन थेट लगतच्या शेतातील गणेश म्हात्रे यांच्या शेतातील विहीर गाठली. काळजावर दगड ठेऊन प्रथम कल्पनाने युवराज व गुड्डीला विहिरीत ढकलले. नंतर स्वत:ही विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपविली. नातू व मुलगी घरी न आल्याने पवार कुटुंबीय चिंतेत सापडले. तेवढ्यातच कुणी तरी विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. सासरच्या छळापायी चिमुकल्यांसह मातेने आत्महत्या केल्याने मांडवा गावावर शोककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी रात्री तिन्ही मृतदेह हातणी येथे नेण्यात आले.पतीसह सासरच्यांवर छळाचा गुन्हा दाखलकल्पनाचा भाऊ गणेश पवार याने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कल्पनाचा पती अंकुश राठोड याच्यासह सासरा विजय राठोड, रेखा राठोड, आशा राठोड, देवका राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली. चिमुकल्यांसह मातेने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली.आरोपी पसारशुक्रवारी हातणी येथे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर शनिवारी दिग्रस पोलिसांनी गाव गाठले. राठोड यांच्याकडे आरोपींची चौकशी केली. मात्र आरोपींपैकी घरी कुणीही आढळले नाही. नातेवाईकांनी अंकुशसह इतर आरोपी कुठे गेले, याची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस पथक रिकाम्या हाताने दिग्रसला परतले.
माय-लेकांना साश्रूनयनांनी निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 9:31 PM
पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली.
ठळक मुद्देसंडे अँकर । हातणी येथे अंत्यसंस्कार, पैशाच्या मोहाने घेतले बळी