लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : म्युकरमायकोसिस हा आजार पूर्वीसुद्धा होत होता. मात्र, त्याचे रुग्ण क्वचितच आढळत होते. कोरोना महामारीच्या संकटात अनेकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. यामुळेच बुरशी संसर्गाचा धोका वाढला आहे. हा आजार नाकातून जबड्यांच्या पोकळीत, डोळ्यात व तेथून मेंदूत जातो. शस्त्रक्रियेने त्याला वेळीच नियंत्रणात आणता येते. मात्र, यात मानवी अवयव निकामी होण्याचा धोका आहे. हा आजार संपर्कात आल्याने फैलावत नाही. नाकाच्या पोकळ्या साफ करून त्याचा प्रादुर्भाव थांबविता येतो. मात्र, तो पुढे डोळ्यात किंवा घशात जाऊन रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण करू शकतो. याचे निदान करण्यासाठी काॅन्ट्रास्ट एमआरआयची गरज भासते. त्यावरूनच अचूक निदान करून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. ज्या भागाला बुरशी लागली तो भाग तत्काळ काढून टाकावा लागतो. यासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन महाग असून ती रुग्ण वाढल्याने सहज उपलब्ध होत नाही. शासन स्तरावरूनही म्युकरमायकोसिस नियंत्रणासाठी टास्क फोर्स स्थापन केले जात आहे. त्यातून रुग्णांवर उपचाराचा प्रोटोकाॅल ठरवून नियंत्रण आणण्याचे प्रयत्न आहे.
५०० इंजेक्शनची गरज, मिळतात फक्त ५० - म्युकरमायकोसिस या आजारात हॅम्पो ट्रेसिंग बी हे इंजेक्शन दिले जाते. ते अतिशय महागडे असून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका रुग्णाला दररोज चार इंजेक्शन देण्याची गरज आहे. मात्र इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने इतर पर्यायी औषधांचा वापर करून उपचार केला जात आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरशी संसर्गाचे रुग्ण आढळत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ५०० इंजेक्शन लागत असताना ५० मिळत आहेत.
ही घ्या काळजी
- शुद्ध हवा, योग्य आहार, नियमित व्यायाम या माध्यमातून बुरशी संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. ज्यांना कोविड होऊन गेला अशा रुग्णांनी सलग तीन महिने डाॅक्टरांचा सल्ला घेत राहावा, जेेणेकरून कुठला बदल झाल्यास तत्काळ उपचार घेणे सहज शक्य होणार आहे. नाकात तेल टाकणे टाळावे.
तज्ज्ञ डाॅक्टरांच्या प्रतिक्रिया
नाकातील सायनसमधून म्युकरमायकोसिसचा फैलाव होतो. तो नाकातून जबड्याच्या हाडात, डोळ्यात व तेथून मेंदूत जाऊ शकतो. त्यामुळे डायबिटीज, किडनी, लिव्हर, कॅन्सर व इतर दुर्धर आजाराच्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी. हा आजार संपर्कातून फैलावत नाही. -डाॅ. सुधीर पेंडकेनेत्ररोगतज्ज्ञ, यवतमाळ
हा जुनाच आजार आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की तो होतो. नाक, कान, घसा अस्वच्छ असल्यास तेथे वातावरणातील बुरशी प्रवेश करून रक्तवाहिन्यांना बाधा पोहोचविते. मांस पेशींना बुरशीमुळे इजा होते. वेळेत उपचार न घेतल्यास धोका आहे. - डाॅ. दीपक सव्वालाखेनाक-कान-घसा तज्ज्ञ, यवतमाळ
कोरोनातून बरे झालेलेच नव्हे तर सामान्य व्यक्तींनी शुगर नियंत्रित ठेवावी. नियमित गरारे करावे, स्वच्छ मास्क वापरावा, नाकात तेल किंवा इतर कुठले द्रव टाकू नये. अधिक वाफ घेणेही धोकादायक आहे. तरच बुरशी संसर्ग टाळता येणे शक्य आहे. - डाॅ. शेखर घोडेस्वारसहयोगी प्राध्यापक, यवतमाळ
म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे- या आजाराची लागण झाल्यास सर्दीची लक्षणे जाणवू लागतात. सामान्य सर्दीपेक्षा यात प्रचंड त्रास होतो. - असह्य डोकेदुखी होऊन गाल सुजतो, डोळ्यांच्या खालील भाग काळा पडायला लागतो. डोळे लाल होतात. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत.