उमरखेड : सोन्याची चेन चोरल्याचा आळ घेऊन सलून व्यावसायिकांना नाहक पोलीस ठाण्यात नेऊन मन:स्ताप देणाऱ्या मुंबईच्या त्या इसमाविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी शेकडो नाभिक समाज बांधव गुरुवारी सायंकाळी उमरखेडच्या पोलीस ठाण्यावर धडकले. येथील कैलासस्मृती हेअर पार्लरमध्ये मुंबई येथील जगदीश दत्तू घरत हा इसम आला. दाढी केल्यानंतर त्याने या ठिकाणी आपली १० तोळे सोन्याची चेन चोरीस गेल्याचा कांगावा सुरू केला. तो मुंबईतील डान्स बारचा मालक असल्याचे सांगत होता. एवढेच नाही तर पोलिसात तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी सलूनमधील व्यावसायिकांचा आपल्या पद्धतीने समाचार घेतला. परंतु चेन सापडत नव्हती. शेवटी पोलिसांनी तक्रारकर्त्या घरतची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या उजव्या दंडाला सोन्याची चेन बांधून असल्याचे लक्षात आले. तो पोलिसांची माफी मागू लागला. परंतु संतप्त नाभिक समाजाने रोष व्यक्त करीत आमच्या समाजाची बदनामी झाली. नाभिक समाजाला नाहक त्रास दिला, असे म्हणत जगदीश घरत, त्याचा सहकारी संदीप ठाकरे या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेनंतर नाभिक समाजाने आपली दुकाने बंद ठेऊन निषेधही केला. (शहर प्रतिनिधी)
नाभिक समाज धडकला उमरखेड पोलीस ठाण्यावर
By admin | Published: January 01, 2016 3:41 AM