दहा लाख मिळाले : शासनाच्या विविध योजनांमध्ये मारली बाजीउमरखेड : तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाचा दहा लाख रुपयांचा स्मार्ट व्हिलेज ग्राम पुरस्कार पटकाविला. १ मे महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदींसह इतर सर्व अधिकारीवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागापूर येथील सरपंच सविता कदम, उपसरपंच गोदाजी जाधव व ग्रामसेवक महेंद्र डांगे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. नागापूर ग्रामपंचायतीने आपल्या गावात विविध विकासात्मक कामे करून गेल्या १५ वर्षांत शासनाचे विविध पुरस्कार मिळविले आहे. उमरखेड तालुक्यात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यात ही ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांचे हे गाव असून त्यांचेही मार्गदर्शन व सहकार्य गावाच्या विकासाला लाभत आहे. कुटुंब नियोजन, शंभर टक्के शौचालय, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, निर्मल गाव पुरस्कार, हरियाली पुरस्कार, आदर्श ग्राम पुरस्कार असे पुरस्कार या गावाने मिळविले आहे. गावातील नागरिकांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये ग्रामपंचायत तत्पर असते. त्यामुळेच आता स्मार्ट व्हिलेज ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. (शहर प्रतिनिधी)
नागापूरला स्मार्ट व्हिलेज ग्राम पुरस्कार
By admin | Published: May 02, 2017 12:07 AM