यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने एकूण १०२ जागांपैकी ३९ जागांवर विजय मिळविला आहे. तर २५ जागा घेऊन शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी भाजपला १३ जागांवर समाधान मानावे लागले.
नगरपंचायत निवडणूक ही स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनविली होती. जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधानसभेचे पाच आमदार आहेत. तर विधान परिषदेचा एक आमदार आहे. विधानसभा आमदारांना आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती ताब्यात राखता आल्या नाहीत. याउलट विजयासाठी संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली.
राळेगाव विधानसभेतील राळेगाव, कळंब, बाभूळगाव तर वणी विधानसभेतील मारेगाव, झरी तसेच उमरखेड विधानसभेतील महागाव नगरपंचायतीत काॅंग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. राळेगावमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. यापाठोपाठ शिवसेनेने बाभूळगावमध्ये सर्वाधिक सहा जागा, झरी येथे पाच, मारेगावमध्ये चार, तर महागावमध्ये पाच, कळंब येथे तीन, राळेगावमध्ये दोन जागांवर विजयी मिळविला आहे. भाजपला बाभूळगाव, कळंब, झरी, मारेगाव, राळेगाव येथे जबर धक्का बसला आहे. झरी येथे जंगोम दलाने चार जागा मिळवून नगरपंचायतीत प्रवेश घेतला आहे. बाभूळगाव येथे प्रहारची एक जागा विजयी झाला. कळंबमध्ये वंचितनेही एक जागा मिळवत प्रवेश मिळविला आहे. मनसेनेही तीन जागा पटकाविल्या आहेत.
भाजपच्या सत्ताधारी आमदारांपुढे नगरपंचायतीचा निकाल हा आत्मचिंतन करायला लावणारा आहे. आता राळेगाव वगळता इतर पाच नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी आघाडीचे समीकरण जुळवावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आल्यास नगरपंचायतीमध्येही सत्ता बसविणे सहज शक्य आहे. मात्र स्थानिक पातळीवर काय घडामोडी होतात यावरूनच आकड्यांचा खेळ जुळणार आहे.
असे आहे पक्षीय बलाबल काॅंग्रेस : ३९ शिवसेना : २५राष्ट्रवादी : ०४भाजपा : १३जंगोम दल : ०४मनसे : ०३वंचित : ०१प्रहार : ०१ अपक्ष : १२