समायोजनच नाही : ग्रामपंचायतने ठरविलेल्या मानधनावरच कामगजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुकास्तरीय ग्रामपंचायतींना ८ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन पंचायतमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र कळंबसह जिल्ह्यातील एकाही कर्मचाऱ्यांचे यथायोग्य पदावर करण्यात आले नाही. ग्रामपंचायतने ठरवून दिलेल्या तुटपुंज्या मानधनावर शेकडो कर्मचारी आपला उदरनिर्वाह करत आहे. काही ठिकाणी समायोजनाची कार्यवाही प्रारंभ करण्यात आली. परंतु ती अन्यायकारक असल्याची बहुतांश कर्मचाऱ्यांची ओरड आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतमधील कर्मचारी संख्येच्या २० टक्के कर्मचाऱ्यांनाच समायोजनासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित ८० टक्के कर्मचाऱ्यांना अपात्र करण्यात आले. पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता लावून त्यांचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यात त्रुट्या असल्यास त्रुटी पूर्ण करण्याची कुठलीही संधी न देता अशा लोकांना सरळ शिपाई पदावर नेमणूक केली जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीपासून शिपाई पदावर असलेल्या लोकांना अपात्र ठरविले जात आहे. कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन करावे, ज्या पदावर कार्यरत आहे त्याच पदावर समायोजन करण्यात यावे. त्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता नियुक्तीवेळेस निश्चित करण्यात आली होती तीच ग्राह्य धरावी. अथवा त्यांचे पूर्ततेसाठी कालावधी देण्यात यावा. पदांच्या आकृतिबंधात सुधारणा करावी, आदी मागण्या नगरपंचायत कर्मचारी कर्मचारी संघटनेकडून होत आहे.
नगर पंचायतचे कर्मचारी अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:11 AM