असाही प्रताप : लोहारा डाक कार्यालयातील प्रकाराने संतापयवतमाळ : लोहारा डाकघराच्या कारभाराचा अजब नमुना पुढे आला आहे. नागरिकांचे विविध संदेशपत्र यासह आधारकार्ड आदी साहित्य एका नालीत आढळून आले. लोहारा परिसरातील जागरूक युवकांच्या दक्षतेमुळे ही बाब उघड झाली आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली. यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. रजिस्टर पोहोच पावती नसलेली डाक लोहारा डाक कार्यालयातून नागरिकांपर्यंत अपवादानेच पोहोचते. रजिस्टरपत्रही आठवडा पंधरा दिवसानंतर पोहोचविले जाते. याप्रकारात काही बाबतीत वेळ निघून गेलेली असते. एकूणच या डाकघराचा कारभार मनमानी सुरू आहे, याचा पुरावाच सापडला. लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक ४-५ मध्ये येत असलेल्या इंदिरानगर भागातील नालीत डाकघरातील विविध साहित्याचा ढिग आढळून आला. यामध्ये पोस्टकार्ड, आधारकार्ड, जीवनविमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे, बँकेचे पासबुक, पेन्शनधारकांचे कागदपत्र आदी बाबींचा समावेश होता. जनहीत माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडे, अनिल चवरे, कुणाल खाडे, शिवम हिरुळकर आदींनी सदर प्रकाराची माहिती पोलिसात दिली. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)
‘आधार’सह संदेशपत्र नालीत
By admin | Published: January 03, 2016 2:57 AM