किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री सडक योजना, ग्रामीण सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून रस्त्याची कामे होत आहे. रात्री १ ते २ वाजतापर्यंत अंधुक प्रकाशात कामे करण्यात येत आहे. या भागातील रस्ते खूप वर्दळीचे नसतानाही कामे रात्रीच का केली जात असावी, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रामुख्याने बाभूळगाव रस्ता तयार करताना रात्रीचीच वेळ निवडली जात आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. डांबराचे कमी प्रमाण, निकृष्ट गिट्टी, साहित्याचा थर कमी असल्याचे सांगितले जाते. रात्री काम झाल्यास हा सर्व प्रकार झाकला जातो, त्यामुळेच अशा पद्धतीने कामे होत असल्याचे सांगितले जाते. ही कामे करताना मजुरांचा जीवही धोक्यात येण्याची भीती आहे. थोड्याशा उजेडात काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणींकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष सुरू आहे. मात्र गैरप्रकार लपविण्यासाठी आटापिटा होत असल्याचे सांगितले जाते.कामाच्या तपासणीची गरजबाभूळगाव रस्त्याचे आतापर्यंत झालेले काम गुणनियंत्रण विभागाकडून तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार होत असल्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय अधिकाऱ्यांकडूनही या कामांची तपासणी होत नाही.
नेर तालुक्यात कुठलाही कंत्राटदार रात्री काम करत नाही. संध्याकाळी ७ वाजता कामे थांबविली जातात. यावेळेपर्यंतची कामे रात्री होतात असे म्हणता येणार नाही.- भूपेश कथलकर, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, नेर.