जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला असतानाही शहरात नाल्यासफाई कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नगरपालिकेला मान्सूनपूर्व कामांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बाराभाई मोहल्लासह परिसरात नेहमीच गुडघ्यापर्यंत पाणी साचते. याच भागातील एका हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाली चक्क कचरा व खत टाकून बुजविण्यात आली आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला पूर आला की, विठ्ठलनगर, शंकरनगर, गंगानगर व नदीकाठावरील अनेक घरांत पाणी शिरते. त्यात आधीच नाल्या तुडुंब भरल्याने त्यातील पाणी अनेकांच्या घरात शिरते. अशावेळी त्या भागातील नागरिकांना घरात झोपण्यासाठी तर सोडाच बसण्यासाठीही जागा नसते. महिलांना घरात शिरलेल्या घाण पाण्यात बसून स्वयंपाक करावा लागतो, तेथेच जेवणही तयार करावे लागते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.