यवतमाळ - वयाच्या नव्वदीतही तरुणांनाही लाजवेज अशा उत्साहात येथील नामदेवराव बानोरे यांनी पुणे येथे झालेल्या राज्य मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल चार सुवर्ण पदके पटकाविली. १०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक व लांब उडी या क्रीडा प्रकारात त्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले.
महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे पुणे येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल भोसरी येथे ४० व्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यवतमाळ जिल्हा संघातर्फेसेवानिवृत्त विस्तार अधिकारी नामदेवराव बानोरे यांनी ९० अधिक वयोगटात सहभाग नोंदविला. या गटात त्यांनी १०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक व लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे माजी उपसंचालक जनक टेकाडे यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे नामदेव बानोरे यांनी २०१४ कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत तीन सुवर्ण पदके पटकावून देशाचा गौरव वाढविला होता. त्यांच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे.