लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासकीय कार्यालयात वेळेवर पोहोचल्यानंतरही कर्मचारी नसल्याने अनेकांची कामे होत नाहीत. अनेक कर्मचारी मोबाईलवर पाहायला मिळतात, तर सर्वसामान्य नागरिक आपले काम कधी होईल, याच्या प्रतीक्षेत असतात. ‘लोकमत’ने याचे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागात फेरफटका मारला असता हे भयावह वास्तव पाहायला मिळाले. अशाच प्रकारची स्थिती कमीअधिक प्रमाणात इतर ठिकाणी असते.
काय आहे आचारसंहिता
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. यावेळी काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना फार वाईट अनुभव येतो. काही कर्मचारी सोडले तर अनेक कर्मचारी फोनमध्ये व्यस्त असतात. तर अनेकांचा लंच टाईम झालेला असतो. सर कुठे गेले विचारले तर ते बाहेर गेले अथवा दाैऱ्यावर असतात.
शिक्षण विभाग
शिक्षकांची सर्वाधिक प्रकरणे घेऊन गावपातळीवरचे शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयात येतात. याठिकाणीही असाच अनुभव इतर शिक्षकांना पाहायला मिळतो. अनेकवेळा कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. त्या तुलनेत कामाची फाईल मात्र निकाली निघत नाही.
सरकारी कार्यालय नको रे बाबा !
शासकीय कर्मचारी वेळेवर सापडत नाहीत. अनेकवेळा कामांमध्ये चालढकल होते. सर्वसामान्यांची कामे लवकर झाली तर त्याचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने नियंत्रण ठेवायला हवे.- विनोद दोंदल, नागरिक
कर्मचाऱ्यांचे थम्ब बंद झाल्यापासून कर्मचारी कार्यालयात वेळेवर पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी वेट अँड वाॅच करावे लागते. कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर निर्बंध हवे.- महेश पवार, नागरिक
कार्यालय प्रमुख म्हणतात....
या संदर्भातील आदेश नुकतेच प्राप्त झाले आहे. प्रत्येक विभागात सर्वव्यापक सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. काही विभागात कॅमेरे आहे. मात्र, ते सर्वव्यापक नाही. अशा ठिकाणी कॅमेरे बसणार आहे. त्याचे नियंत्रण विभाग प्रमुखांकडे आणि आमच्याकडेही राहणार आहे.- श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी
कामाच्या वेळात मोबाईल नको म्हणून परिपत्रक आले आहे. कर्मचारी काम सोडून इतर कामात वेळ वाया घालवत असतील तर त्यावर कारवाई नक्कीच होणार आहे. कामाच्या व्यतिरिक्त वेळेत मोबाईलचा वापर करता येतो. मात्र, कार्यालयात अधिक वेळ मोबाईल पाहणे हा कामचुकारपणा आहे.- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ