पुसद : नवी मुंबई विमानतळाला नव्या मुंबईचे शिल्पकार महानायक वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी व औद्योगिक क्रांतीचे जनक, नवी मुंबईचे शिल्पकार वसंतराव नाईक यांचे कर्तृत्व राज्यासह देशालाही गौरव करणारे असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दृष्टीने नवी मुंबईची उभारणी केली. तत्कालीन विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. परंतु दूरदृष्टी असणारे वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई उभारली.
त्यांच्या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देणे अतिशय समर्पक आणि उचित आहे. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षातील अनेक बाबी आजही प्रलंबित आहेत. किमान नवी मुंबईचे शिल्पकार, नवी मुंबईचे खरे रचनाकार असलेल्या व हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी हे निवेदन पाठविले आहे.